अखेर मोदी जिंकले! अभूतपूर्व गोंधळात कृषी विधेयकांना राज्यसभेची मंजुरी - agriculture bills passed in rajya sabha amid protest of opposition leaders | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर मोदी जिंकले! अभूतपूर्व गोंधळात कृषी विधेयकांना राज्यसभेची मंजुरी

वृत्तसंस्था
रविवार, 20 सप्टेंबर 2020

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण पेटले असताना मोदी सरकारने अखेर ती मंजूर करण्यात यश मिळविले आहे. या वेळी विरोधकांनी विधेयकांना जोरदार आक्षेप घेतल्याने गोंधळ निर्माण झाला होता.  

नवी दिल्ली : देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. मोदी सरकारने ही विधेयके संमत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ही बहुचर्चित दोन कृषी विधेयके आज राज्यसभेत मांडण्यात आली. विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच सरकारने आवाजी मतदानाने ही दोन्ही विधेयके मंजूर केली. अखेर या विधेयकांना राज्यसभेची मान्यता मिळवण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे. 

कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. आज त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ केला. सभापतींसमोरील हौद्यात जाऊन सदस्यांनी विधेयकाविरोधात घोषणा दिल्या. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करुन घेण्यात सरकारला यश आले. राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.  

या विधेयकांवरुन मोदींना सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. या विधेयकांसाठी ते स्वत: मैदानात उतरुन विरोधकांवर हल्लाबोल करीत होते. ते म्हणाले होते की, कृषी क्षेत्र सुधारणा विधेयके ही ऐतिहासिक असून, या मुद्द्यावर केवळ दुष्प्रचार व शेतकऱ्यांना संभ्रमित करण्याचे उद्योग सुरू आहेत. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचेच भले होणार आहे.  

कृषी विधेयकांना विरोध होत असला तरी ती संसदेत मंजूर करण्यावर पंतप्रधान  मोदी ठाम होते. हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी 12 तासाच्या आत मंजूर केल्याने मोदी सरकार या मुद्द्यावर अकाली दलासह इतर कोणत्या विरोधाला जुमानणार नाही हे अधोरेखित झाले होते. मोदी म्हणाले होते की, शेतकऱ्यांच्या नावावर वर्षानुवर्षे फक्त सत्ता उपभोगणाऱ्यांनी 70 वर्षांत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले. या आडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. 

जे पक्ष आता खोटे बोलत आहेत त्यांनी अनेक दशके शेतकऱ्यांना हीच आश्‍वासने दिली होती. आता तीच आश्वासने एनडीए सरकार पूर्ण करत असताना हे पक्ष शेतकऱ्यांचीच दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात आहेत. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणार नाही, शेतकऱ्यांच्या धान्याची, गहू, तांदळाची खरेदी सरकार करणार नाही, हा सारा निव्वळ दुष्प्रचार असून शेतकऱ्याला किमान हमी भाव मिळण्यापासून कोणतेही सरकार व कोणताही कायदा आला तरी तो रोखू शकणार नाही, अशी टीकाही मोदींना विरोधकांवर केली होती.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख