भाजप अॅक्शन मोडवर : मोदींचा राज्यपालांना फोन तर नड्डा तातडीने बंगालमध्ये - after west bengal violence pm narendra modi called governor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

भाजप अॅक्शन मोडवर : मोदींचा राज्यपालांना फोन तर नड्डा तातडीने बंगालमध्ये

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार उसळला असून, यात आतापर्यंत 12 जण ठार झाले आहेत. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार उसळला असून, यात आतापर्यंत 12 जण ठार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेतली असून, त्यांनी याबाबत थेट राज्यपाल जगदीप धनकर यांना फोन केला. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने या हिंसाचाराबद्दल राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे तातडीने दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. (after west bengal violence pm narendra modi called governor)

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर भाजप अॅक्शन मोडमध्ये गेल्याचे दिसत आहे. राज्यात उसळलेल्या हिंसाचाराबद्दल पंतप्रधान मोदींनी थेट राज्यपाल धनकर यांनी फोन केला. याबाबत धनकर यांनी ट्विट केले असून, त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी राज्यातील चिंताजनक कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या प्रकारांची माहिती पंतप्रधानांच्या कानावर घातली आहे. लूटमार आणि हत्यांचे सत्र राज्यात सुरूच आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने कायदा व सुव्यवस्था निर्माण करायला हवी. 

हेही वाचा : मोदींनी ममतांना फोन केलाचा नाही 

बंगालमधील पराभवानंतर बॅकफूटवर गेलेला भाजप पुन्हा एकदा फ्रंटफूटवर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे तातडीने दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. नड्डा हे राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेण्यासोबत हिंसाचारग्रस्त भागाला भेट देणार आहेत.

राज्यातील सहा जिल्ह्यांत झालेल्या हिंसाचारात 8 जणांची हत्या झाली असून, यात भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे, असा दावा भाजपने केला आहे. तृणमूल काँग्रेसने हा हिंसाचार केल्याचा आरोप भाजपने केला आहे.  दरम्यान, कोलकत्यात एक आणि सोनारपूरमध्ये एक असे दोन जण ठार झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने मात्र, आपल्याच दोन कार्यकर्त्यांचा हिंसाचारात मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 213 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपला 77 जागा मिळाल्या आहेत. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करीत आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख