कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर महिनाभराने पोलीस महानिरीक्षक 'पॉझिटिव्ह' - after taking second covid dose police inspector general found positive | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर महिनाभराने पोलीस महानिरीक्षक 'पॉझिटिव्ह'

वृत्तसंस्था
सोमवार, 5 एप्रिल 2021

देशात 1 एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास येत आहे. 

नवी दिल्ली : देशात 1 एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास येत आहे. दरम्यान, कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर महिनाभराने पोलीस महानिरीक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याचबरोबर त्यांचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलीस महानिरीक्षक राजेश पांडे यांना संसर्ग झाला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. पांडे यांची पत्नी, त्यांच्या सुरक्षारक्षकांनाही लागण झाली आहे. त्यांच्या संसर्गात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पांडे यांचा मुलगाही पॉझिटिव्ह आढळला आहे. 

उत्तर प्रदेश पोलीस दलातील पोलीस महानिरीक्षक राजेश पांडे यांनी ५ फेब्रुवारीला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर त्यांनी ५ मार्चला दुसरा डोस घेतला. त्यानंतर आता महिनाभराने पांडे यांना संसर्ग झाला आहे. पांडे यांच्या पत्नीने लशीचा पहिला डोस घेतला होता. पांडे यांच्या सुरक्षारक्षकांनी दोन्ही डोस घेतले होते आणि तेसुद्धा पॉझिटिव्ह आले आहेत. पांडे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

१ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी सरकारने नोंदणीचे दोन पर्याय ठेवले आहेत. यासाठी सरकारी को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा असेल. मात्र, प्रत्यक्ष नोंदणीसाठी नागरिकांना दुपारी 3 वाजल्यानंतर लसीकरण केंद्रावर जावे लागेल.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. त्यामुळे आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नोंदणी आपोआप होत होती. आता दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे असल्याने आपोआप नोंदणी बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागेल. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख