सुनंदा पुष्कर, बुरारी कांड अन् सुशांत प्रकरणाचे सायकॉलॉजिकल ऑटोप्सी कनेक्शन...

सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा तपास सीबीआयने सुरू केला आहे. यात रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सुनंदा पुष्कर आणि बुरारी कांडानंतर आता सुशांत प्रकरणामुळे सायतॉलॉजिकल ऑटोप्सी चर्चेत आली आहे.
after sunanda pushkar and burari case psychological autopsy may be conducted in sushant case
after sunanda pushkar and burari case psychological autopsy may be conducted in sushant case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह यांच्यासोबत  चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची सीबीआयने चौकशी केली होती. आता सुशांतची सायकॉलॉजिकल ऑटोप्सी करण्याचा विचार सीबीआय करीत आहे. यासाठी सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) सीबीआयला मदत करणार आहे. याआधी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण आणि बुरारी कांडात सायकॉलॉजिकल ऑटोप्सी करण्यात आली होती. 

सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली होती. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी 14 जूनला घरात उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांचा समावेश होता. नीरज  याची सीबीआयने मंगळवारी सलग पाचव्या दिवशी चौकशी केली होती. सिद्धार्थ याचीही काल सलग चौथ्या दिवशी चौकशी करण्यात आली. याचबरोबर सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांचीही काल चौकशी करण्यात आली. काही वेळ चौकशी झाल्यानंतर ते तेथून बाहेर पडले. याचबरोबर मुंबई पोलिसांचे पथकही काल सकाळी गेस्ट हाऊसवर येऊन सीबीआय पथकाला भेटले. काही वेळ चर्चा केल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथून बाहेर पडले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे. मात्र, या अहवालात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे सीबीआय सुशांतची सायकॉलॉजिकल ऑटोप्सी करण्याचा विचार करीत आहेत. सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल) ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहे. सायकॉलॉजिकल पोस्ट मॉर्टेममध्ये सुशांतच्या मनाचेच एकप्रकारे पोस्ट मॉर्टेम करण्यात येईल. यात सुशांतच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टींचे सर्व पैलू तपासण्यात येतील. त्याचे कुटुंबीयांशी असलेले संबध, मित्र, वर्तन, स्वभावातील बदल, सोशल मीडिया पोस्ट यासह अनेक बाबींची तपासणी करण्यात येईल. यातून सुशांतची त्याच्या मृत्यूआधीची मानसिक स्थिती स्पष्ट होईल. त्याने आत्महत्या केली असेल तर ती करण्यामागील कारणांचाही शोध घेता येईल. 

सायकॉलॉजिकल पोस्ट मॉर्टेममध्ये सुशांतच्या कुटुंबीयांशी संवाद साधला जाईल. याचबरोबर त्याने आयुष्यात घेतलेले निर्णय का आणि कोणत्या परिस्थितीत घेतले याचीही तपासणी होईल. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते का हेही शोधण्यात येईल. सुशांतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी करण्यात येईल. ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असून, तिला वेळ खूप लागतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दिल्लीत बुरारी कांडात ही पद्धती वापरण्यात आली होती. दिल्लीत बुरारी परिसरातील एकाच कुटुंबातील 11 सदस्यांनी 1 जुलै 2018 रोजी आत्महत्या केली होती. यानंतर सीबीआयने या कुटुंबातील सदस्यांची सुमारे दशकभरातील सायकॉलॉजिकल ऑटोप्सी केली होती. यात या कुटुंबातील ललित भाटिया हा सदस्य धार्मिक कर्मकांडाबद्दल लिहित होता आणि त्या पाळण्याचे आदेश कुटुंबीयांना देत असल्याचे समोर आले  होते. हे कर्मकांड करीत असतानाच या कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाल्याचे सीबीआयने शेवटी स्पष्ट केले होते. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर त्याला भेटण्यासाठी हे कुटुंब कर्मकांड करीत असल्याचे समोर आले होते. 

काँग्रेस नेते शशि थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर या दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये 17 जानेवारी 2014 रोजी मृतावस्थेत आढळल्या होत्या. यातही दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सायकॉलॉजिकल ऑटोप्सी केली होती. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या जबाबातून थरुर यांच्याशी सुनंदा यांचे संबध बिघडले असल्याचे समोर आले होते. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com