शशिकलांनी राजकीय संन्यास घेतला अन् लगेचच भाचा दिनकरनने रणशिंग फुंकले! - after sasikala retirement announcement ttv dinakaran announces about contesting poll | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

शशिकलांनी राजकीय संन्यास घेतला अन् लगेचच भाचा दिनकरनने रणशिंग फुंकले!

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मार्च 2021

शशिकलांच्या पुनरागमनानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली होती. आता त्यांनी सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. 

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी अचानक राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या या राजकीय संन्यासाचा सर्वांत मोठा धक्का त्यांचे पुतणे आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांना बसला आहे. मात्र, दिनकरन यांनी मागे न हटता लगेचच निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. 

शशिकलांनी काल (ता.3) निवेदन जाहीर केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, जया (जयललिता) जिवंत असताना मी कधीही सत्ता अथवा पदाच्या मागे धावले नाही. जललितांचा मृत्यू झाल्यानंतर असे कदापी घडणे शक्य नाही. तमिळनाडूत अण्णाद्रमुकला सोन्याचे दिवस यावेत यासाठी मी राजकारणापासून दूर राहत आहे. मी ईश्वर आणि माझ्या बहिणीला (जयललिता) अण्णाद्रमुकच्या विजयासाठी प्रार्थना करते. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन द्रमुकचा पराभव करावा. जयललितांचा वारसा कायम राखण्यासाठी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी काम करावे. 

भाजपने तमिळनाडूत अण्णाद्रमुकशी आघाडी केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये  मतविभाजणी झाली होती. तसा प्रकार होऊन नये यासाठी अण्णाद्रमुक एक राहावा म्हणून भाजपने प्रयत्न केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असे शशिकलांनी म्हटले होते. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अण्णाद्रमुक आघाडीचा तमिळनाडूत मोठा पराभव झाला होता. अण्णाद्रमुकला केवळ एक जागा मिळाली होती. त्याचवेळी द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला तब्बल 38 जागा मिळाल्या होत्या. 

शशिकलांच्या निवृत्तीचा सर्वांत मोठा धक्का त्यांचे भाचे  व अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) पक्षाचे नेते दिनकरन यांना बसला आहे. शशिकलांनी निवृत्ती जाहीर करण्याआधीच ते तेथे हजर होते. बराच वेळ शशिकलांची समजूत काढण्याचा प्रयत्न दिनकरन यांनी केला. मात्र, शशिकला या निर्णयावर ठाम राहिल्या. अखेर दिनकरन यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. 

हेही वाचा : शशिकलांच्या अचानक झालेल्या राजकीय एक्झिटमागे भाजपचाच हात!

याविषयी बोलताना दिनकरन यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करुन मी निवडणूक लढवण्याबाबत आढावा घेणार आहे. शशिकलांचा निर्णय हा त्यांचा असून, त्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही. अम्मांची सर्व मुले एकत्र राहावीत, अशी त्यांची इच्छा आहे. मी त्यांची 30 मिनिटे समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी विचार बदलला नाही. एएमएमके पक्षाकडे सुमारे 1 हजार 300 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. उमेदवारांची यादी 10 मार्चला जाहीर करण्यात येईल. 

हेही वाचा : तमिळनाडूत राजकीय भूकंप 

शशिकला यांनी चेन्नई न्यायालयामध्ये मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अण्णाद्रमुक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात नव्याने अर्ज केला होता. शशिकला या पक्षाच्या सरचिटणीस होत्या, पण २०१७ मध्ये त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावेळीच शशिकला यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आता त्यांनी या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार १५ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख