बॅकसीटवरील ममता बॅनर्जींनी स्मृती इराणींना आणले फ्रंटसीटवर!

निवडणूक आयोगाकड़ून पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकारण तापले आहे.
after mamata banerjee scooter ride smriti irani also rides scooter in west bengal
after mamata banerjee scooter ride smriti irani also rides scooter in west bengal

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना फोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जेरीस आणले आहे. असे असताना ममता बॅनर्जी या भक्कमपणे उभ्या राहून भाजपला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. ममतांच्या विरोधात भाजपने आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना मैदानात उतरवले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या, तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे ममतांनी काल इलेक्ट्रिक स्कूटरवरुन  कामावर जाणे पसंत केले. घरी जातानाही त्या याच स्कूटरवरून गेल्या. ममता या स्कूटरवर मागे बसल्या होत्या तर नागरी विकास मंत्री फिरहाद हकीम स्कूटर चालवत होते. हा संपूर्ण प्रवास  फेसबुकवरुन प्रसारित करण्यात आला. 

या वेळी स्कूटवर बसूनच ममतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यातून भाजपवर निशाणा साधला आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त असून, केंद्रातील भाजप सरकारने अद्याप कोणताही दिलासा यावर दिला नाही. हा मुद्दा ममतांनी उपस्थित केला आहे. याचवेळी ममतांनी इंधनावरील कर कमी करुन जनतेला दिलासा दिला आहे. 

भाजपने ममतांच्या विरोधात स्मृती इराणींना मैदानात उतरवले आहे. ममतांनी काल स्कूटरच्या बॅकसीटवर बसून प्रवास केल्याने स्मृती इराणी यांनी तातडीने स्कूटर बाहेर काढली. त्या स्वत: स्कूटर चालवत भाजपच्या दुचाकी रॅलीत सहभागी झाल्या. कोलकत्यातील अरुंद गल्ल्यांतून त्या कार्यकर्त्यांसमवेत आज रॅलीच्या निमित्ताने स्कूटर चालवताना दिसल्या. या निमित्ताने बॅकसीटवरील ममतांनी स्मृती इराणींना फ्रंटसीटवर आणल्याची चर्चा सुरू आहे. 

निवडणूक आयोगाकडून आज पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. पण या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. तर पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्तेत नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. 

पाचही राज्यांमध्ये भाजप, काँग्रेससह स्थानिक प्रादेशिक पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. सभा, विविध विकासकामांचे उद्घाटन यांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या नसल्या तरी बहुतेक पक्षांनी प्रचाराची एक फेरी जवळपास पूर्ण केली आहे. आता केवळ आयोगाकडून तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. 

Edited Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com