काँग्रेस सोडल्यानंतर जोतिरादित्य पहिल्यांदाच सोनिया गांधींबद्दल बोलले

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
after leaving congress jotiraditya scindia first time talks about sonia gandhi
after leaving congress jotiraditya scindia first time talks about sonia gandhi

भोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. जोतिरादित्य शिंदे हे समर्थक आमदारांसह काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे या निवडणुका होत आहेत. शिंदे यांनी आता जोरदार प्रचार सुरू केला आहे. काँग्रेस सोडल्यानंतर आज पहिल्यांदाच ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींबद्दल बोलले. 

काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या माजी मंत्री व महिला उमेदवार इमरती देवी यांचा उल्लेख आयटम असा केला होता. यावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना सुरूवातीला या प्रकरणात नोटीस बजावली होती. त्यानंतर आयोगाने कमलनाथ यांना या प्रकरणी दोषी ठरवले असून, वादग्रस्त वक्तव्ये न करण्याची तंबी दिली आहे. 

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यांनतर आज पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या विषयी जाहीर वक्तव्य केले आहे. कमलनाथ यांच्या प्रकरणावरुन जोतिरादित्य शिंदे यांनी आज अप्रत्यक्षपणे सोनिया गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या अध्यक्षांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर कारवाई करायला हवी. हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. तरीही 50 टक्के महिला लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येक राजकीय पक्षाने काहीतरी दर्जा सांभाळायला हवा. 

कमलनाथ आणि अजयसिंह यांनी इमरती देवींच्या बद्दल केलेली विधाने ही त्यांची मानसिकता दर्शविणारी आहेत. यातून दलित महिलेविषयीची काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची मानसिकताही समोर येत आहे. महिलेबद्दल अशा प्रकारचे असंसदीय वक्तव्य केले जात असेल तर त्यातून तुमचे संस्कार, तत्वे आणि मूल्ये दिसून येतात. कमलनाथ यांनी पूर्वाश्रमीच्या सहकारी महिलेबद्दल केलेले विधान निषेधार्ह आहे, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com