भाजप अन् नितीशकुमारांची डोकेदुखी वाढवून चिराग पासवान म्हणाले, 'लेट मी एंजॉय द मोमेंट!' - after breaking ties with nda chirag paswan said let me enjoy the moment | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप अन् नितीशकुमारांची डोकेदुखी वाढवून चिराग पासवान म्हणाले, 'लेट मी एंजॉय द मोमेंट!'

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आधी महाआघाडीमध्ये फूट फडल्यानंतर आता सत्ताधारी एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष बाहेर पडला आहे. यामुळे भाजप आणि नितीशकुमार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र अपेक्षित होते. मात्र, आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या एलजेपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी माघार न घेण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने झाली मात्र, यात बिहारमधील तिढा सुटलेला नाही. 

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने एलजेपी, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचा विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता एनडीएमध्ये गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील एलजेपीने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला होता. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबले होते. 

या पार्श्वभूमीवर एलजेपीच्या नेत्यांच्या बैठक आज पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रामविलास पासवान या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीनंतर पक्षाने निवेदन जाहीर केले आहे. यात म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आमची भक्कम आघाडी आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर आमचे जेडीयूसोबत वैचारिक मतभेद आहेत. यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीनंतर आमचे विजयी उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर भाजपसोबत असतील. 

एनडीएशी फारकत घेण्याच्या निर्णयानंतर चिराग पासवान यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी त्यांनी लेट मी एंजॉय द मोमेंट अशी प्रतिक्रिया दिली. चिराग यांच्या पवित्र्यामुळे बिहारमध्ये एनडीए अडचणीत आली आहे. त्यांनी जेडीयूला विरोध आणि भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन एनडीएची कोंडी केली आहे. याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी चिराग यांच्याशी आज चर्चाही केली होती. मात्र, चिराग यांनी नितीशकुमारांच्या नेतृत्नाखाली निवडणूक लढवण्यास साफ नकार दिला आहे. 

बिहारमध्ये जेडीयूच्या उमेदवार ज्या मतदारसंघात असेल तेथे विरोधात एलजेपी उमेदवार देणार आहे. मात्र, राज्यात भाजपचा उमेदवार असेल तेथे विरोधात उमेदवार न देता पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार बनावे, असे एलजेपीने म्हटले आहे. एलजेपीने आता विरोध केला असला तरी निकालानंतर  भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. एलजेपीच्या या भूमिकेमुळे नितीशकुमार  आणि भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची तातडीची बैठक दिल्लीत झाली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, शहनवाज हुसेन आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते. एलजेपीने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्याने भाजपची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत बिहारमधील तिढा सोडवण्याबाबत काहीही ठोस निर्णय झालेला नाही. 

एलजेपीने एकाच वेळी भाजपला पाठिंबा देण्याची आणि जेडीयूला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आघाडी म्हणून जनतेसमोर जाण्याचा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. कारण जेडीयू आणि एलजेपीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात असतील. त्यातील एकाला पाठिंबा देणे अथवा विरोध करणे पक्षाला शक्य नाही. यामुळे पक्षाची गोंधळलेली अवस्था होण्याची शक्यता आहे. यातूनत जनतेपर्यंत चुकीचा संदेश जाऊन एनडीएवरील आत्मविश्वास कमी होऊ शकतो, असा धोका भाजप नेतृत्वाला वाटत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख