कोलकता : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. काही दिवसांपूर्वी नेताजी बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाषण सुरू असताना 'जय श्रीराम' असे नारे देत घोषणाबाजी झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा उपस्थित होते. यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. आता भाजपच्या 'जय श्रीराम'ला उत्तर म्हणून तृणमूलने 'हे राम'चा नारा पुढे केला आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या 'वेस्ट बेंगाल अँड कोलकता युनिव्हर्सिटी प्रोफेसर असोसिएशन'ने (डब्ल्यूईबीसीयूपीए) 'हे राम'चा नारा दिला आहे. राज्यात विविध जिल्ह्यांत असोसिएशनचे सदस्य 'हे राम' लिहिलेले फलक घेऊन येथील एकत्र आले होते. याबद्दल असोसिएशचे अध्यक्ष कृष्णकली बासू म्हणाले की, महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा त्यांनी 'हे राम' असे शब्द उच्चारले होते. त्यामुळे नथुराम गोडसे यांचे पूजन करणाऱ्यांना रामाच्या नावाने घोषणा देणे शोभत नाही.
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ जयंतीनिमित्त पश्चिम बंगालध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या होत्या. त्या बोलत असताना उपस्थितांमधून जय श्रीरामची घोषणाबाजी झाल्याने त्या संतापल्या. पंतप्रधानांसमोरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत भाषण बंद केले. आता याला प्रत्युत्तर म्हणून तृणमूलच्या संघटनेने 'हे राम' चा नारा पुढे केला आहे. यावरुन भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.
व्हिक्टोरिया मेमोरियल कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि ममता व्यासपीठावर एकत्र आले होते. परंतु, दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले होते. ममता या बोलण्यासाठी उभ्या राहिल्यानंतर त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गर्दीतून जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे त्या संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, हा राजकीय कार्यक्रम नाही. सरकारी कार्यक्रमात शिष्टाचाराचे पालन व्हायला हवे. कोलकत्यात हा कार्यक्रम घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे मी आभार मानते. पण एखाद्याला व्यासपीठावर बोलावून त्याचा अपमान करणे शोभा देत नाही. याचा विरोध करत मी आणखी काही जास्त बोलणार नाही. जय हिंद, जय बांगला.
Edited by Sanjay Jadhav

