तिकिट वाटपावरुन मारामारी सुरू असताना भाजपकडून पक्षात नसलेल्यांनाही उमेदवारी - after bjp gives ticket two candidates refused to contest west bengal assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

तिकिट वाटपावरुन मारामारी सुरू असताना भाजपकडून पक्षात नसलेल्यांनाही उमेदवारी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मार्च 2021

भाजपने पश्चिम बंगालमधील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून, यात पक्षात नसलेल्या व्यक्तींचीही नावे असल्याने खळबळ उडाली आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये तिकिट वाटपावरुन भाजपमध्ये अंतर्गत दुफळी समोर आलेली असताना पक्षाने 148 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात पक्षात नसलेल्या दोन जणांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. दिवंगत काँग्रेस नेते सोमेन मित्रा यांच्या पत्नी शिखा आणि तरुण साहा यांची नावे आहेत. या दोन्ही नेत्यांनी निवडणूक भाजपशी संबंध नसल्याने निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तिकिट वाटपावरुन पक्षात असंतोष माजलेला असताना पक्षात नसलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन नेतृत्व तोंडघशी पडले आहे.   

भाजपने काल जाहीर केलेल्या यादीत माजी केंद्रीय मंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष मुकुल रॉय यांचा समावेश असून, खासदार जगन्नाथ सरकार यांचाही समावेश आहे. आतापर्यंत भाजपने पाच विद्यमान खासदारांना बंगाल विधानसभेच्या मैदानात उतरवले असून, यात एका केंद्रीय मंत्र्याचाही समावेश आहे. तसेच, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा, लोककलाकार अशीम सरकार, शास्त्रज्ञ गोवर्धन दास यांचा समावेश आहे. मात्र, यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना स्थान देण्यात आलेले नाही. 

चौरंगी लेन मतदारसंघातून शिखा मित्रा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली. तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांच्या मित्रा कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. शिखा यांनी काही दिवसांपूर्वी अधिकारींची भेट घेतली होती. यामुळे त्या भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. परंतु, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच पक्षाने त्यांना तिकिट जाहीर केले आहे. 

यावर अखेर शिखा मित्रा यांनीच या प्रकरणी खुलासा केला. त्या म्हणाल्या की, मला न विचारताच भाजपने उमेदवारी दिली आहे. मी कोणतीही निवडणकू लढवणार नाही. याचबरोबर मी भाजपमध्ये प्रवेश करण्याची कोणतीही शक्यता नाही. मी कोठूनही निवडणूक लढण्याची अजिबात शक्यता नाही. मला न विचारता ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माझा आणि भाजपचा काहीही संबंध नाही. 

तरुण साहा यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. साहा यांना काशीपूर-बेलगाचिया या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या विद्यमान आमदार माला साहा यांचे ते पती आहेत. ते म्हणाले की, माझा संबंध तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. मला न विचारता भाजपने त्यांच्या उमेदवारी यादीत माझे नाव घुसवले.  

पक्षाची पहिली यादी आठवडाभरापूर्वी जाहीर झाली होती. पहिल्या यादीत निष्ठावंतांना डावलण्यात आल्यामुळे पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयावरच हल्ला केल्याचे प्रकार घडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तिकिट वाटपाच्या मुद्द्यावरुन भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पक्ष कार्यालयाबाहेरच भाजप कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून आंदोलन करीत असल्याचे चित्र आहे. 

भाजपने तिकिट दिलेल्या उमेदवारांमध्ये तृणमूल काँग्रेसमधील आयात उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पक्षातील निष्ठावंत नाराज झाले आहेत. कोलकत्यातील भाजप कार्यालयाबाहेर तिकिट वाटपावरून नाराज झालेले कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. काही जागांवर पक्षाने दिलेले उमेदवार मान्य नसल्याने हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून दगडफेकीसह नेत्यांना धक्काबुक्की करण्याचे प्रकार सुरू आहेत. 

तिकिट वाटपावरून नाराज झालेले कार्यकर्ते पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करीत आहेत. नुकतीच पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय, अर्जुनसिंह आणि शिव प्रकाश यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोलकत्यात आले होते. त्यावेळीही भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  याचबरोबर लोखंडी बॅरिकेडही कार्यालयाबाहेर उभे करण्यात आली आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख