अखेर ठरलं...देशभरात ममतादीदी देणार पंतप्रधान मोदींना आव्हान - after bengal victory mamta banerjee challenge narendra modi in country | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

अखेर ठरलं...देशभरात ममतादीदी देणार पंतप्रधान मोदींना आव्हान

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जून 2021

बंगालमध्ये भाजपला धूळ चारल्यानंतर इतर राज्यांत भाजपला नामोहरम करण्याची घोषणा अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली आहे. बंगालमध्ये भाजपला धूळ चारल्यानंतर इतर राज्यांत भाजपला (BJP) नामोहरम करण्याची घोषणा अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे. यामुळे आगामी काळात देशात नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरुद्ध ममता बॅनर्जी असा लढा पाहायला मिळणार आहे. 

तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर घराणेशाहीचा आरोप भाजपने विधानसभा निवडणुकीत केला होता. पंतप्रधान मोदींसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी प्रचारात भाचे अभिषेक बॅनर्जींच्या मुद्द्यावरुन ममतांना लक्ष्य केले होते. आता ममतांनी अभिषेक यांना वारसदार ठरवले आहे. यामुळे पुन्हा एकदा मोठा गदारोळ उडाला असून, विरोधकांनी ममतांवर हल्लाबोल केला आहे. अनेक भाजप आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचा दावाही बॅनर्जी यांनी केला आहे. 

आता तृणमूलच्या सरचिटणीसपदाची धुरा हाती घेतल्यानंतर अभिषेक बॅनर्जींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक कोपऱ्यात तृणमूलचा विस्तार करण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा महिनाभरात तयार होईल. प्रत्येक राज्यात भाजपला टक्कर देण्यासाठी तृणमूल मैदानात उतरेल. देशभरातील एक लाखाहून अधिक नागरिकांचे ई-मेल आम्हाला मिळाले आहेत. आम्ही बंगालमध्ये भाजपचा पराभव केला याबद्दल आभार मानणारे हे ई-मेल आहेत. तृणमूल जिथे शक्य असेल तिथे भाजपला रोखण्यात येईल. 

पक्षात तुम्ही दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहात का, या प्रश्नावर बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, ममता बॅनर्जी या प्रथमस्थानी आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतात. आमच्या पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे पद वगैरे काही नसते. दुसऱ्या क्रमांकाचे पद हे सर्व पक्षा कार्यकर्त्यांचे आहे. तृणमूलला राष्ट्रीय पक्ष बनवण्यासाठी हे आम्ही करणार नाही तर निवडणूक जिंकण्यासाठी करणार आहोत. देश आणि राज्यघटना वाचवण्यासाठी देशातील जनता आता ममतांकडे आशेने पाहत आहे. 

हेही वाचा : पुढील 20 वर्षे निवडणूक लढवणार नाही; अभिषेक बॅनर्जींची प्रतिज्ञा 

तृणमूल काँग्रेसची महत्वाची बैठक नुकतीच. या व्हर्च्युअल बैठकीला पक्षाचे आमदारही उपस्थित होते. निवडणूक निकालानंतर आमदारांची ही पहिलीच बैठक झाली. या बैठकीला ममतांचे रणनीतीकार प्रशांत किशोर हे सुद्धा उपस्थित होते. याच बैठकीत अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यावर शिक्कामोर्तब झाले. याचबरोबर पक्षाच्या युवा विभागाच्या अध्यक्षपदी अभिनेत्री सयोनी घोष यांची निवड करण्यात आली. याचवेळी कुणाल घोष यांची राज्य सरचिटणीसपदी निवड झाली. 

अभिषेक यांच्याकडे पक्षाच्या युवा विभागाचे अध्यक्षपद होते. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली. तृणमूलमध्ये एक नेता एक पद असे धोरण आहे. यानुसार त्यांनी युवा विभागाची जबाबदारी सोडली. त्यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी ममतांनी सोपवली. या घडामोडीमुळे ममतांचा वारसदार कोण, या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले होते. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 213 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. या वेळी 77 जागांसह भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी सत्ता स्थापन केली. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली होती.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख