रिया चक्रवर्तीला जामीन नाहीच; न्यायालयीन कोठडीत रवानगी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून वातावरण तापले आहे. अखेर एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली आहे.
actress rhea chakrabortys bail application rejected by court
actress rhea chakrabortys bail application rejected by court

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली. चौकशीनंतर एनसीबीने रियाला अटक केली. रियाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. एनसीबीने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने रियाची जामिनाची मागणी फेटाळून तिला 14 दिवसांचा न्यायालयीन कोठडी दिली आहे. 

'एनसीबी'कडून रियाची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. तिच्यासोबत तिचा भाऊ शौविक याचीही चौकशी झाली. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. लवकरच एनसीबी या कलाकारांना पुढील 10 ते 15 दिवसांत नोटीस बजावण्याची शक्यता आहे. 

आता रियाला अटक करण्यात आली असून, तिची वैद्यकीय चाचणी सायन रुग्णालयात करण्यात आली. तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. वैद्यकीय चाचणीनंतर पुन्हा तिला एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले. रियाला एनसीबीच्या कार्यालयात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियाला रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. एनसीबीने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले.  

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे तिच्या एनसीबी कोठडीची मागणी करण्यात येणार नाही. तिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. मात्र, रियाच्या जामिनाला आम्ही विरोध करु. रियाच्या ताब्यात आम्हाला कोणतेही अमली पदार्थ सापडलेले नाहीत. तिने चौकशीत दिलेला कबुली हिच तिला अटक करण्यासाठी पुरेशी आहे. 

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com