शिवसेनेनंतर 'आप'चेही मत विरोधी पक्षांच्या पारड्यात - aap supports opposition candidate manoj jha for rajya sabha deputy chairman election | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेनंतर 'आप'चेही मत विरोधी पक्षांच्या पारड्यात

वृत्तसंस्था
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी आज निवडणूक होत आहे. यात एनडीए आणि विरोधी पक्षांचे उमेदवार आमनेसामने आहेत. राज्यसभेतील सरकार आणि विरोधकांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने येणार आहे. 

मुंबई : राज्यसभा उपसभापतिपदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते हरिवंशसिंह यांना रिंगणात उतरवले आहे. विरोधी पक्षांनी राष्ट्रीय जनता दलाचे (जेडीयू) नेते मनोज झा यांना रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेने काल मनोज झा यांना पाठिंबा दिला होता. आज आम आदमी पक्षानेही (आप) झा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यसभेतील सरकार आणि विरोधकांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने येणार आहे.  

मनोज झा यांनी 11 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यसभा उपसभापतिपदासाठी ते विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर एनडीएचे उमेदवार हरिवंशसिंह यांचे आव्हान आहे. उपसभापतिपदाचा हरिवंशसिंह यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपल्याने हे पद रिकामे झाले होते. आता यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आजच निवडणूक होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनोज झा यांना शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले होते की, राज्यसभा उपसभापतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा आहे. 

'आप'चे नेते व खासदार संजयसिंह यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार मनोज झा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष विरोधी पक्षांचे उमेदवार संजयसिंह यांना पाठिंबा देत आहे. 

राज्यसभेचे एकूण संख्याबळ 245 असून, एनडीए उमेदवाराचा विजय सहज मानला जात आहे. कारण तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, अण्णाद्रमुक या पक्षांचा पाठिंबा एनडीएच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून ते 1 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाता प्रश्नोत्तराचा तास असणार नाही. 

आज दुपारी 3 नंतर राज्यसभेचे कामकाज सुरू होईल आणि ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालेल. आजच राज्यसभा उपसभापतिपदाची निवडणूक होणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने येणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. 

राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या 245 असली तर एक जागा रिक्त आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 123 आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे 110 सदस्य आहेत. वायएसआर काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती आणि बिजू जनता दलानेही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राज्यसभेत वायएसआर काँग्रेसचे 9, तेलंगण राष्ट्र समितीचे 6 आणि बिजू जनता दलाचे सात सदस्य आहेत. 

राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत हरिवंश यांनी काँग्रेसचे उमेदवार बी.के.हरिप्रसाद यांचा पराभव केला होता. त्यावेळी हरिवंश यांना 125 मते आणि हरिप्रसाद यांना 105 मते मिळाली होती. त्यावेळच्या तुलनेत भाजपची राज्यसभेतील स्थिती आणखी मजबूत झाल्याने हरिवंश यांचा विजय नक्की मानला जात आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख