AAP MLA Somnath Bharti sentenced for two years for assaulting AIIMS security guards
AAP MLA Somnath Bharti sentenced for two years for assaulting AIIMS security guards

सुरक्षारक्षकांना मारणं पडलं महागात...आमदाराला दोन वर्षांची शिक्षा अन् एक लाखाचा दंड

सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने आमदाराला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) सुरक्षारक्षकांना मारहाण करणं आमदाराला चांगलंच महागात पडलं आहे. आम आदमी पक्षाचे (आप) आमदार सोमनाथ भारती यांना दिल्लीतील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. याचबरोबर त्यांना एक लाख रुपये दंडही करण्यात आला आहे. हा प्रकार 2016 मध्ये घडला होता. 

अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी रविंद्रकुमार पांडे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी आमदार भारती यांना जामीन मंजूर झाला असून, ते या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. या प्रकरणातील इतर चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

सोमनाथ भारती हे 9 सप्टेंबर 2016 रोजी तीनशे जणांचा जमाव घेऊन 'एम्स'वर गेले होते. त्यांनी 'एम्स'च्या संरक्षक भिंतीचे कुंपण जेसीबीने पाडले होते. याचबरोबर सुरक्षारक्षकांनाही मारहाण केली होती. या प्रकरणी न्यायालयाने भारती यांनी जाणीवपूर्वक दुसऱ्याला इजा करणे, सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी दबाव टाकणे आणि दंगल आदी आरोपांखाली दोषी ठरवले होते. सरकारी पक्षाने भारती यांच्यावरील आरोप सर्व संशयापलिकडे सिद्ध केले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दलही न्यायालयाने भारती यांना दोषी ठरवले होते. 

भारती यांचे सहकारी जगत सैवी, दिलीप झा, संदीप सोनू आणि राकेश पांडे यांची मात्र, न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे कारण न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी 'एम्स'चे मुख्य सुरक्षा अधिकारी आर.एस.रावत यांनी तक्रार दिली होती. न्यायालयात भारती यांना त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांनी साक्षीदार सादर केले, असा दावा केला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com