आमदाराला सरकारी भिंत पाडायला जाणं पडलं महागात; न्यायालयानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा - aap mla somanth bharti sentenced for two years by session court | Politics Marathi News - Sarkarnama

आमदाराला सरकारी भिंत पाडायला जाणं पडलं महागात; न्यायालयानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मार्च 2021

सरकारी भिंत पाडल्याप्रकरणी न्यायालयाने आमदाराला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) संरक्षक भिंत पाडणं आमदाराला चांगलंच महागात पडलं आहे. आम आदमी पक्षाचे (आप) आमदार सोमनाथ भारती यांना विशेष न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. हा प्रकार 2016 मध्ये घडला होता. 

भारती यांना जानेवारी महिन्यात अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी रविंद्रकुमार पांडे यांनी दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी आमदार भारती यांना जामीन मंजूर झाला होता. त्यांनी या निकालाविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली होती. ही शिक्षा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. 

सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी भारतींची याचिका फेटाळून लावत त्यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. भारतींनी दंगल, बेकायदा जमाव जमवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, जाणीवपूर्वक इजा करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे आरोप न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहेत. 

सोमनाथ भारती हे 9 सप्टेंबर 2016 रोजी तीनशे जणांचा जमाव घेऊन 'एम्स'वर गेले होते. त्यांनी 'एम्स'च्या संरक्षक भिंतीचे कुंपण जेसीबीने पाडले होते. याचबरोबर सुरक्षारक्षकांनाही मारहाण केली होती. या प्रकरणी न्यायालयाने भारती यांनी जाणीवपूर्वक दुसऱ्याला इजा करणे, सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी दबाव टाकणे आणि दंगल आदी आरोपांखाली दोषी ठरवले होते. सरकारी पक्षाने भारती यांच्यावरील आरोप सर्व संशयापलिकडे सिद्ध केले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दलही न्यायालयाने भारती यांना दोषी ठरवले होते. 

भारती यांचे सहकारी जगत सैवी, दिलीप झा, संदीप सोनू आणि राकेश पांडे यांची मात्र, न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे कारण न्यायालयाने दिले होती. या प्रकरणी 'एम्स'चे मुख्य सुरक्षा अधिकारी आर.एस.रावत यांनी तक्रार दिली होती. न्यायालयात भारती यांना त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांनी साक्षीदार सादर केले, असा दावा केला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख