मोदी सरकारकडून 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 90 हजार कोटी जमा : स्मृती इराणी - 90 thousand crore was transferred into the accounts of more than 10 crore farmers says Smriti Irani | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारकडून 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 90 हजार कोटी जमा : स्मृती इराणी

वृत्तसंस्था
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. 

नवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावर राज्यसभा आणि लोकसभेतील कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. आता सरकारने यावर कडी करत राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली आहे. भाजप सरकारने यासाठी संसदेतील कोरोनाचा वाढत्या प्रसाराचे कारण दिले असले तरी विरोधकांच्या बहिष्काराचे अस्त्र निकामी करणे हा यामागील खरा उद्देश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता सरकारच्या वतीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी मैदानात उतरल्या आहेत. 

विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांच्या दालनात राज्यसभा कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर सर्व विरोधी पक्षीय खासदार महात्मा संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जमले. त्यांच्या हातात 'किसान बचाव'  यासारखे फलक विविध भाषांमध्ये लिहिलेले होते. आझाद, पटेल, डेरेक ओब्रायन, तिरूची सिवा, रामगोपाल यादव,, ए करीम, केके रागेश, आनंद शर्मा ,राजीव सातव, वंदना चव्हाण, फौजिया खान, कुमार केतकर आधी खासदार पुतळ्यापासून पदयात्रेने आकारांच्या पुतळ्याजवळ गेले आणि तेथून माघारी फिरले. 

राज्यसभेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करीत संसद अधिवेशनावर बहिष्कार टाकणार्‍या राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या सुमारे शंभर खासदारांनी आज संसदेच्या आवारातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरात मूक पदयात्रा काढली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून या कायद्यांवर स्वाक्षरी न करता ते राज्यसभेकडे परत पाठवावेत, असे साकडे विरोधी पक्षीय खासदार घातले आहे. 

स्मृती इराणी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेसने दहा वर्षे सत्तेत असताना स्वामिनाथन अहवालाची अंमलबजावणी केली नाही. मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी केली आणि दीडपट हमी भाव दिला. शेतकरी सम्मान निधी योजनेअंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात मोदींनी 90 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. कृषी विधेयकातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना तीन दिवसांत त्यांच्या मालाचा दाम मिळणे बंधनरकारक आहे.  

इराणी यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षांत केवळ देशाच्या हिताचेच काम केले आहे. मोदींनी 2014 आणि 2019 मध्ये भारत मध्यस्थांच्या कचाट्यातून सोडवण्याचे आश्वासन दिले होते. या दिशेने पंतप्रधान मोदी हे आता वाटचाल करीत आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख