पॅरोल नको रे बाबा! तब्बल 26 कैद्यांचा तुरुंगाबाहेर पडण्यास नकार - 26 convicts from various maharashtra jails refuse parole | Politics Marathi News - Sarkarnama

पॅरोल नको रे बाबा! तब्बल 26 कैद्यांचा तुरुंगाबाहेर पडण्यास नकार

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जून 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. या काळात कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई : कोरोना महामारीमुळे (Covid19) कैद्यांना (Convicts) पॅरोलवर सोडण्यात येत आहे. परंतु, कैदी मात्र तुरुंगातून (Jail) बाहेर पडण्यास तयार नाहीत. याला कारण आहे कोरोना संकटाचे. बाहेर पडल्यानंतर महामारीमुळे काही रोजगार मिळणार नाही आणि आपण कुटुंबावर ओझे ठरू अशी भीती या कैद्यांना सतावत आहे. यामुळे राज्यातील तब्बल 26 कैद्यांनी पॅरोलवर बाहेर पडण्यास चक्क नकार दिला आहे. 

महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेथील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात कैद्यांना पॅरोलवर बाहेर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक कैद्यांना तातडीचा पॅरोल मिळूनही त्यांनी बाहेर जाण्यास नकार दिला. ओडिशातील एक कैदी फसवणूक प्रकरणात तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पॅरोलवर बाहेर सुटल्यास कुटुंबावर मी ओझे बनेन, असे म्हणून त्याने पॅरोल नाकारला होता. याचबरोबर कोरोना महामारीमुळे बाहेर पडल्यानंतर रोजगारही मिळणार नाही, अशी भीती अनेक कैद्यांना आहे. अनेक कैदी हे शिक्षेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तुरुंगाच राहू असे म्हणत आहेत. 

हेही वाचा : फक्त दहा रुपयांत कोरोना रुग्णांवर उपचार करणारा अवलिया डॉक्टर 

याविषयी बोलताना आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणाले की, पॅरोलासाठी पात्र दोन कैदी आमच्याकडे आहेत. परंतु, त्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत येथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एकाची शिक्षा पुढील पाच दिवसांत तर दुसऱ्याची ऑक्टोबरमध्ये संपत आहे. आम्ही कैद्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरवत आहोत. कैद्यांसाठी आम्ही वेगळे कोरोना केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे कैद्यांना बाहेरच्यापेक्षा तुरुंगात अधिक सुरक्षित वाटत असावे. 

महाराष्ट्र सरकारने याबाबत उच्च न्यायालयाला माहिती दिली होती. कैदी हे पॅरोलवर बाहेर जाण्यास तयार नसल्याचे सरकारने सांगितले होते. राज्यातील तुरुंगात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची दखल न्यायालयाने घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन सुनावणी घेतली आहे. राज्यातील तुरुंगात असलेले 26 कैद्यांनी पॅरोल नाकारल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख