येडियुरप्पांच्या गच्छंतीनंतर कर्नाटकात 'कमळ' फुलवणाऱ्या 16 नेत्यांवर टांगती तलवार

कर्नाटकात भाजपचे सरकार येण्यास काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलातून आलेले 16 आमदार कारणीभूत ठरले होते.
16 turncoats in bjp are expected to retain there status
16 turncoats in bjp are expected to retain there status

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपचे (BJP) सरकार येण्यास काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलातून आलेले 16 आमदार कारणीभूत ठरले होते. यातील 11 जण आता भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी राजीनामा दिल्याने या आयाराम नेत्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी राज्यातील काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार येडियुरप्पांनी पाडले होते. त्यांनी दोन्ही पक्षांतील नेत्यांना फोडले होते. यामुळे राज्यात पुन्हा कमळ फुलले होते. भाजपमध्ये आलेल्या या आयाराम नेत्यांना त्यामुळे मानाचे स्थान देण्यात आले होते. या 16 आमदारांपैकी 11 जणांना मंत्रिपद, 2 जणांना महामंडळ मिळाले असून, 3 जणांकडे केवळ आमदारकीच आहे. 

येडियुरप्पांवर विश्वास टाकून हे नेते भाजपमध्ये आले होते. आता येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाले आहेत. राज्यातील सरकारमध्ये मोठे फेरबदल घडणार आहेत. यात मंत्रिमंडळातही नवीन मुख्यमंत्र्यांसोबत अनेक नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. यात तरुण आणि पक्षाच्या निष्ठावंतांना स्थान देण्यात येईल. त्यामुळे आयारामांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे हे आयाराम अस्वस्थ झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेतृत्वाने पुढील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी नेमले आहे. रेड्डी हे बंगळूरमध्ये दाखल झाले आहे. बंगळूरमध्ये आज सायंकाळी भाजपच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल.  

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर येडियुरप्पा तातडीने राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तिथे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी येडियुरप्पांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी येडियुरप्पांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईपर्यंत येडियुरप्पा राज्याची धुरा सांभाळतील. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com