विरोधी आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांच्या नावाचा आग्रह धरला तर सरकार पडेल... - If Pawar's name is insisted on for the leadership of the Opposition, the government will fall | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधी आघाडीच्या नेतृत्वासाठी पवारांच्या नावाचा आग्रह धरला तर सरकार पडेल...

जगदीश पानसरे
सोमवार, 22 मार्च 2021

देशात मोदी सरकार सत्तेवर आणण्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे कसे करू शकतील? पण विरोधकांकडून दिशाभूल केली जात आहे. सरकार कायद्यात बदल करायला तयार आहे, पण कायदाच बदला, अशी मागणी करणे योग्य नाही. असे झाले तर सगळे कायदे मागे घ्यावे लागतील, मग संसद आणि संविधानाला काही अर्थ उरणार नाही, असेही आठवले म्हणाले.

औरंगाबाद ः देशपातळीवर भाजप विरोधात होऊ घातलेल्या आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे सोपवावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याकडून केली जात आहे. शिवसेनेचा हा आग्रह कायम राहिला, तर काॅंग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल आणि हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. शरद पवारांचे नाव पुढे केले तर याच मुद्यावर काॅंग्रेस कोणत्याही क्षणी सरकारचा पाठिंबा काढून घेईल, आणि त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा देखील रामदास आठवले यांनी केला.

औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना आठवले यांनी शेतकरी आंदोलन, केंद्राने केलेले कृषी कायदे कसे शेतकरी हिताचे आहे, सांगतानाच पुन्हा एकदा एक्याचा सुर आळवला. यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली आहे, या प्रश्नावर मग मी काय करू, असे मिश्किल उत्तर देत त्यांनी एक छोटी कविताही सादर केली. ` मी पीत नाही बीडी, माझ्याकडे आहे सत्तेची सीडी, मग कशी येईल माझ्याकडे ईडी`, अशा शब्दांत त्यांनी ईडीचा विषय टोलवला.

रामदास आठवले म्हणाले, पंजाब वगळता देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध नाही हे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करायला लावणे म्हणजे शेतकरी संघटनांकडून त्यांना वेठीस धरण्यासारखे आहे. या आंदोलनात चौदाहून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा आंदोलनाचा अतिरेक न करता तडजोडीची भूमिका घेऊन संघटनांनी सरकारशी चर्चा करायला हवी. २०२० मध्ये सुरू झालेले आंदोलन नवीन वर्षात जाता कामा नये, अशी आमची इच्छा आहे.

देशात मोदी सरकार सत्तेवर आणण्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे कसे करू शकतील? पण विरोधकांकडून दिशाभूल केली जात आहे. सरकार कायद्यात बदल करायला तयार आहे, पण कायदाच बदला, अशी मागणी करणे योग्य नाही. असे झाले तर सगळे कायदे मागे घ्यावे लागतील, मग संसद आणि संविधानाला काही अर्थ उरणार नाही, असेही आठवले म्हणाले.

शरद पवार हे राज्यातील व देशातील मोठे नेते आहेत, ते मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री राहिलेले आहेत. तेव्हा त्यांनी देखील शेतकऱ्यांची समजूत घालून हे आंदोलन मागे कसे घेतले जाईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल? या प्रश्नावर आठवले म्हणाले, हे सरकार पाडण्यात भाजपला रस नाही, हे सरकार त्यांच्यातील मतभेदातूनच पडेल. देशपातळीवरील भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे, यावरून सध्या धुसफूस सुरू आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडे हे नेतृत्व असावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे याच मुद्यावरून काॅंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काॅंग्रेसने पाठिंबा काढला की, महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि भाजप सत्तेवर येईल, असा दावा आठलेंनी केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख