शरद पवारांनी शब्द दिला अन मी मंत्री झालो..! - gulabrao devkar talks about his association with ncp chief sharad pawar | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांनी शब्द दिला अन मी मंत्री झालो..!

कैलास शिंदे
शनिवार, 12 डिसेंबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत. 

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदार संघातून २००९मध्ये मी प्रथमच आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आलो. आमदार म्हणून आपण प्रथमच पक्षाच्या बैठकीला उपस्थित होतो. त्यावेळी बैठक संपल्यावर शरद पवारांनी तुम्हाला मंत्रिमंडळात घेण्यात येईल, शपथविधीसाठी तुम्हाला फोन येईल एवढेच सांगितले होते. त्याप्रमाणे मला फोन आल्यानंतर आनंद झाला. साहेबांनी शब्द दिला अन तो पूर्ण झाला हा आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, अशी आठवण माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी सांगितली. 

गुलाबराव देवकर हे राज्याचे माजी मंत्री आहेत. सन २००९ मध्ये ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातून प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी त्यावेळी शिवसेनेचे दिग्गज नेते गुलाबराव पाटील यांचा पराभव केला होता. प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांना आघाडी सरकारच्या राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून घेण्यात आले. तसेच, जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होते.  

या आठवणीबाबत ते म्हणाले, मी जळगाव ग्रामीण मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रथमच विजयी झालो होतो. त्यावेळी शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांचा मी पराभव केला होता. विजयी झाल्यानंतर मी मुंबईत प्रथमच आमदार म्हणून गेलो. पक्षाच्या बैठकीत सर्वांची ओळख झाली. पक्षाचे नेते शरद पवार यांनी सर्व निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांचा सत्कार केला. मी नवीनच आमदार असल्यामुळे आपण सर्वाशी चर्चा करून माहिती घेत होतो.

राज्याचे मंत्रिमंडळ होण्यास एक महिन्याचा कालावधी होता, त्यावेळी मी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या भेटीस गेलो होतो. त्यावेळी त्यांची भेट झाली त्यांनी चर्चा करून माहिती घेतली त्या वेळी त्यांनी सांगितले, तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल. तुम्हाला शपथविधीसाठी फोन येईल. त्यांनी हे सांगताच मला आनंद झाला मात्र विश्‍वास बसत नव्हता. त्यांच्या हा शब्द माझ्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण होता. खरोखरच मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या एक दिवस आधी मला अजित पवार व छगनराव भुजबळ यांचा फोन आला. उद्या तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला यायचे आहे, हे  शब्द फोनवर ऐकताच  आनंद झाला अन डोळ्यातून अश्रुही तरळले. साहेबांनी आपल्याला सांगितले अन तो शब्दही खरा केला. हा क्षण आपल्याला जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होता, असे देवकर यांनी सांगितले. 

साहेबांच्या कुटुंबासमवेत भोजन
शरद पवार यांनी मला एकदा बारामती येथे भोजनास बोलाविले होते. मी त्यांच्या घरी भोजनास गेल्यानंतर कुटुंबातील सदस्याप्रमाणेच त्यांनी माझी विचारपूस केली. प्रतिभाताई, सुप्रियाताई आणि साहेबांच्या सोबत भोजनाचा क्षण मी आजही विसरू शकत नाही. जेवताना प्रतिभाताई आणि साहेबांनी मला अगत्याने खाण्याचा आग्रह केला. भोजन झाल्यावरही मी तब्बल दीड तास त्याच्यांशी विविध विषयावर चर्चा केली. त्यांच्या आपुलकीने मी भारावलो, असेही देवकर यांनी सांगितले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख