`मराठा समाजाने नेतृत्व भाजपकडे द्यावे, मग बघा काय करतो ते!` - give leadership to bjp and see what we can do says chandrakant patil | Politics Marathi News - Sarkarnama

`मराठा समाजाने नेतृत्व भाजपकडे द्यावे, मग बघा काय करतो ते!`

सुनील पाटील
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

मराठा आरक्षणप्रश्नी भाजप आक्रमक 

कोल्हापूर : महावितरणमध्ये नियुक्त झालेल्या मराठा तरुणांना सरकारच्या निर्णयामुळे सेवेत रुजू होता आले नाही. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. मराठा समाजाने आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व भाजपकडे द्यावे, मग बघाच काय करतो. असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.

 चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजप सरकारने मराठा समाजाला `एससीबीसी`चे आरक्षण दिले. त्यावेळी जे मोर्चे निघाले त्यामध्ये मी सहभागी झालो. पण मराठा संघटनांनी ठरवल्याप्रमाणे मोर्चाच्या मागे होतो. या सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. अशा वेळी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी कायदेशीर मार्गाने काही हालचाली करणे आवश्‍यक होते. मात्र तेही झाले नाही. स्थगितीपूर्वी ज्या शासकीय विभागातील जाहिरातील निघाल्या, मुलाखती झाल्या त्यांना केवळ नियुक्तीपत्र देणे बाकी होते. पण तेवढ्यात स्थगितीचा निर्णय आला. मराठा समाजातील अशा तरुणांना नियुक्तीपत्र देण्यासाठी न्यायालयाला विनंती करणे गरजेचे होते. मात्र तेही केले नाही. आता तर शिक्षणातील आणि शासकीय नोकऱ्यांमधील भरतीही पूर्वीप्रमाणेच होणार असून मराठा समाजाला `एससीबीसी`चा लाभ मिळणार नाही.

अकरावी किंवा अन्य प्रवेशाबाबत जागा वाढवणे आवश्‍यक आहे. शासनाच्या हातामध्ये आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. त्यांना मराठा समाजाला गरीबच ठेवायचे आहे. मराठ समाजाच्या लढ्याला राजकीय रंग येऊ नये म्हणून मोर्चे निघत होते त्यावेळी आम्ही मागे राहाण्याची भूमिका घेतली. आता मराठा समाजाने नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पक्षाला द्यावी. मग बघाच काय करतो, असे पाटील यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख