`धनंजय मुंडेंनी आपले विवाहबाह्य संबंध लपविले नाहीत, ही बाब मर्दपणाची`

पुरूषोत्तम खेडेकर यांच्याइतकेमुंडे यांचे इतके जाहीर समर्थन कोणीच केलेले नाही.
purushottam khedekar-dhanajay munde
purushottam khedekar-dhanajay munde

पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपावरून राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेले असताना त्यांना मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.  आम्ही धनंजय मुंडे यांच्या पाठिशी, अशी थेट भूमिका खेडेकरांनी घेतली आहे. मुंडे यांच्यावर आरोप व त्यानंतर त्यांनी दिलेले स्पष्टीकरण यावर खेडेकर यांनी सविस्तर पोस्ट लिहून मुंडे हे कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की  मुंडे यांच्या वैवाहिक जीवनात कुरबुरी सुरू झाल्या आहेत, अशा स्वरुपाची चर्चा ऐकायला मिळाली. याच वेळी  मुंडे यांनी स्वतः फेसबुकवर या आरोपांना सविस्तर उत्तर दिले. त्यांचे स्पष्टीकरण, त्यातील स्पष्टता, सहजता व जबाबदारी समजून वागणूक हे सर्व ऐकून मला मुंडे यांच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे. त्यांनी दिलेल्या जाहीर स्पष्टीकरणाबद्दल मी मुंडे यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी सामाजिक कार्यकर्ते या नात्याने खंबीरपणे उभे राहणार असल्याचे जाहीर करतो .

मी व धनंजय मुंडे एकमेकांना नावापलीकडे ओळखत नाही या पाठींब्याबद्दल मला वा मराठा सेवा संघाला  मुंडे यांच्याकडून काही फायदा झालेला नाही. मी त्यांच्या पाठीशी स्वेच्छेने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. एवढेच नाही तर ही माहिती मला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपण्यापूर्वी मिळाली असती तर मी तेथूनच जाहीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे असल्याचे जाहीर केले असते, असेही खेडेकर यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे व करुणा शर्मा सन २००३ पासून एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले होते. ही बाब धनंजय मुंडे यांच्या परळी वैजनाथ मतदार संघातील सर्वांना  माहित आहे. तसेच त्यावेळी धनंजय मुंडे यांचे वडिल पंडीत अण्णा, काका गोपीनाथ मुंडे जिवंत होते. करुणा शर्मा यांच्यासोबत सर्व मुंडे कुटुंब जुळलेले होते. खुद्द करुणा शर्मा यांनी त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याबाबत सोशल मिडीयावर कबुली दिलेली आहे, असे लिहून खेडेकर म्हणतात की
धनंजय यांनी रेणू शर्मांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असतील ही शक्यता कमी आहे आणि ज्याअर्थी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा सोबतच्या संबंधांचा अधिकृत व जाहिर स्वीकार केलेला आहे, त्याच न्यायाने धनंजय मुंडे यांचा बेधडक स्वभाव लक्षात घेता त्यांचे जर रेणू शर्मा सोबत शारीरिक संबंध असते, तर तेही त्यांनी कबुल केले असते, अशीही पुस्ती जोडली आहे.

धनंजय मुंडे यांनी अशा विवाहबाह्य संबंधांना लपवून ठेवले नाही हे लक्षात घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाबाबत कुटुंब व विशेषतः बायकोपासून हे संबंध लपवून ठेवलेले नव्हते व नाहीत. ही बाब उमदेपणाची किंवा अलंकारिक अर्थाने घ्यावयाचे म्हटल्यास मर्दपणाची आहे. विवाहबाह्य नात्यांना नैतिक उंची व समाजमान्यता देणारी आहे, अशा बेधडक शब्दांत खेडेकरांनी मुंडेंना पाठिंबा दिला आहे.

आज समाजात प्रतिष्ठित व सेलिब्रिटी दर्जा बाळगणारे काही पुरुष एकापेक्षा जास्त महिलांसोबत संबंध प्रस्थापित करताना पहिल्या पत्नीला डिव्होर्स सारख्या कायदेशीर हत्याराने लीलया वेगळे करतात आणि त्या महीलांच्या उर्वरित आयुष्याची राखरांगोळी करतात. आमचा समाज अशा कायदेशीर प्रक्रियेने झालेल्या पहिल्या महिलेवरील अन्यायाला वा शोषणाला योग्य ठरवितो. खासदार हेमामालिनी व धर्मेंद्र हे एक उदाहरण आहे.  या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी त्यांची कायदेशीर पत्नी, लिव्ह इन रिलेशनमधील सहकारी व एकूण पाचही अपत्यांच्या पालनपोषणाची व कौटुंबिक स्वास्थ्य संतुलीत करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती कोणत्याही अर्थाने असमानतेची वा अन्यायाची नाही. अर्थात करुणा शर्मा या त्यांच्या लिव्ह इन रिलेशनमधील सहकारी व रेणू शर्मा महिलेचे स्वातंत्र्य त्यांनी मान्य केले पाहिजे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतू महिलांनी असे करताना गैर मार्गाने जाऊ नये हीच अपेक्षा व विनंती आहे, असे खेडेकर यांनी शेवटी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com