गावचे कारभारी ठरवण्यासाठी उद्या मतदान; ३५ ग्रामपंचायती, ६१० उमेदवार बिनविरोध - Voting tomorrow to decide the village steward; 35 Gram Panchayat, 610 candidates unopposed | Politics Marathi News - Sarkarnama

गावचे कारभारी ठरवण्यासाठी उद्या मतदान; ३५ ग्रामपंचायती, ६१० उमेदवार बिनविरोध

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

वैजापूर तालुक्यात २१६, सिल्लोड ७७, कन्नड २१, पैठण २२, औरंगाबाद ८९, फुलंब्री ५७, सोयगाव ९२ तर खुलताबाद तालुक्यातील ३६ असे एकूण ६१० उमेदवार बिनविरोध ठरले आहेत. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार मतदान करून आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातल्या ५८२ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील २ हजार २६१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे.  शुक्रवारी (ता. १५)  ११ हजार ४९९ उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला मतदान यंत्रात बंद होणार आहे. तत्पुर्वी जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायती व ६१० उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे. 

जिल्ह्याच्या ९ तालूक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ तालूक्यांमधील ३५ ग्रामपंचायतींमध्ये १८३ प्रभागात ६१० सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्वाधिक वैजापुर तालूक्यात ९ तर त्याखालोखाल सिल्लोड तालूक्यात ६ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुक झाली आहे. उद्या,शुक्रवारी जिल्ह्यातल्या ६१७ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. यापैकी ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापुर्वीच बिनविरोध झाल्या असून आता ५८२ ग्रामपंचायतींमधून सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. 

बिनविरोध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पाहता वैजापूर तालुक्यात २१६, सिल्लोड ७७, कन्नड २१, पैठण २२, औरंगाबाद ८९, फुलंब्री ५७, सोयगाव ९२ तर खुलताबाद तालुक्यातील ३६ असे एकूण ६१० उमेदवार बिनविरोध ठरले आहेत. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार मतदान करून आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शुक्रवारी मतदान व सोमवारी ( ता. १८) मतमोजणी होणार आहे. 

दरम्यान मतदान सुरू होण्या आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाणार आहे. फिजिकल डिस्टंस राखण्याच्यादृष्टीने दक्षता घेतली जाणार आहे. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागणार आहे. 

कोरोनाबाधितही करू शकतील मतदान

कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येणार आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या 

 - वैजापूर : १०५ 

- सिल्लोड : ८३ 

- कन्नड ८३ 

- पैठण : ८० 

- औरंगाबाद : ७७ 

- गंगापूर : ७१ 

- फुलंब्री : ५३ 

- सोयगाव : ४० 

- खुलताबाद : २५

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख