उस्मानाबादकरांना ठाकरे सरकारची नववर्ष भेट; मेडीकल काॅलेज आणि रुग्णालयाला मंजुरी - Thackeray government's New Year gift to Osmanabadkars; Sanction to medical college and hospital | Politics Marathi News - Sarkarnama

उस्मानाबादकरांना ठाकरे सरकारची नववर्ष भेट; मेडीकल काॅलेज आणि रुग्णालयाला मंजुरी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे यासाठी पहिला ठराव २१ आॅक्टाेबर २०११ रोजी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासाठी एक तज्ञांची एक समिती देखील नेमण्यात आली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात हा प्रस्ताव बरीच वर्ष रखडला. या समिची अहवाल देखील वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे आठ वर्षांनी म्हणजे १६ सप्टेंबर २०१९ मध्ये सादर केला.

उस्मानाबाद : येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे तसेच ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये ६७४.१४ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व्हावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. अखेर महाविकास आघाडी सरकारने आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या मागणीवर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आज उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली.

 तसेच या महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय हे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खाजगी भागिदारी (PPP) तत्वावर स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण ६७४ कोटींचा निधी देखील मंजुर करण्यात आला आहे.

दहा वर्षानंतर यश मिळाले..

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे यासाठी पहिला ठराव २१ आॅक्टाेबर २०११ रोजी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासाठी एक तज्ञांची एक समिती देखील नेमण्यात आली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात हा प्रस्ताव बरीच वर्ष रखडला. या समिची अहवाल देखील वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे आठ वर्षांनी म्हणजे १६ सप्टेंबर २०१९ मध्ये सादर केला.

त्यानंतर तो वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालय परिसरातच २६.५ एकर जागा उपलब्ध असल्याचे कळवण्यात आले होते. अखेर उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय मंजुर झाल्याने याचा फायदा सर्वसामान्य व गोर-गरीब रुग्णांना होणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख