शिवसेनेने डरकाळी फोडली; क्षीरसागरांनीही पुतण्यावर मात केली - Shiv Sena broke the fear; Kshirsagar also defeated Nephew | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेने डरकाळी फोडली; क्षीरसागरांनीही पुतण्यावर मात केली

दत्ता देशमुख
मंगळवार, 19 जानेवारी 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत बीड मतदार संघात शिवसेनेची कामगिरी चमकदार राहीली. विशेष म्हणजे केज, माजलगाव मतदार संघातही शिवसेनेला काहीसे यश मिळविता आले.
 

बीड : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकली असता शिवसेनेने चांगलीच डरकाळी फोडल्याचे दिसत आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांना काहीशी मात दिली आहे. विशेष म्हणजे केज व माजलगाव मतदार संघातही अनेक ठिकाणी शिवसेनेचे खाते उघडले आहे.

जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील १८ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने १११ ग्रामपंचायतींच्या ८४२ जागांसाठी शुक्रवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी झाली. यात सर्वाधिक ३५ ग्रामपंचायती बीड मतदार संघातील बीड व शिरुर कासार तालुक्यातील होत्या. त्यामुळे सहाजिकच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर सामना होता.

निकालात शिवसेनेने चमकदार कामगिरी केल्याचे समोर आले. निकालानंतर जयदत्त क्षीरसागर, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आदी पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांसोबत विजयाचा गुलाल खेळून आनंदोत्सव साजरा केला.

रायमोहा, टाकळवाडी, व्हरकटवाडी, भानकवाडी, मौज, ब्रम्हगाव, मौजवाडी, मैंदा पोखरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, कारळवाडी, निर्मळवाडी, कर्जणी, कोळवाडी, गुंधा, जिरेवाडी, पिंपळगाव घाट, वासनवाडी, वंजारवाडी, गुंदावाडी, वायभटवाडी, बाळसापूर, बेलखंडी पाटोदा, वरवटी, आहेरधानोरा, मानेवाडी, भंडारवाडी आदी ठिकाणी शिवसेनेने चांगली कामगिरी केली आहे.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांचे कार्यक्षेत्र असलेल्या केज व माजलगाव मतदार संघातही शिवसेनेने यश मिळविले आहे. केज तालुक्यात शिवसेनेने मिळविलेले यश प्रथमच आहे. त्यामुळे या निमित्ताने जिल्ह्यातही शिवसेनेने डरकाळी फोडल्याचे दिसले. तर, काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यावर मात केल्याचे दिसले. जिल्हा प्रमुख सचिन मुळूक व कुंडलिक खांडे यांनाही चमकदार कामगिरी करता आली.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख