शिवसैनिकाच्या हत्येने जालन्यात खळबळ, मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी - Sensation in Jalna over killing of Shiv Sainik, demand for arrest of killers | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसैनिकाच्या हत्येने जालन्यात खळबळ, मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी

लक्ष्मण सोळुंके
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

शेळके यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी कारसह जाळून त्यांना दरीत ढकलण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांपासून शेळके गायब असल्याचे देखील बोलले जाते. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दरीत सापडला.  घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताने माखलेला दगड, रुमाल आणि खिशातील पाकीट सापडले.

जालना :शिवसेना कार्यकर्त्याची हत्या करून त्याला कारमध्ये जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नेरसेवली परिसरातील नागपूर फाटा जवळ ही घटना घडली. रमेश शेळके अस या शिवसैनिकाचे नाव आहे. या घटनेचे माहिती मिळताच माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवसैनिक शेळके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

 शिवसैनिकाची हत्या करून त्याच मृतदेह जाळण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सेवली ते पाहेगाव रोडवरील खोल दरीत एक कार जळालेल्या अवस्थेत पडल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा मृतदेह व कार पाहेगांवचे माजी सरपंच, शिवसैनिक रमेश शेळके (५०) यांची असल्याचे स्पष्ट झाले. कारचा अक्षरशः कोळसा झाला होता.

शेळके यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी कारसह जाळून त्यांना दरीत ढकलण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांपासून शेळके गायब असल्याचे देखील बोलले जाते. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दरीत सापडला.  घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताने माखलेला दगड, रुमाल आणि खिशातील पाकीट सापडले.

पाकिटातील ओळखपत्र वरूनच हा मृतदेह रमेश शेळके यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत शेळके शिवसैनिक असून घटनेची माहिती मिळताच  माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, यांच्यासह सेवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, शिवसैनिकाच्या हत्येने जालना हादरले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख