उस्मानाबाद नगर पालिकेत आमदार राणा पाटील गटाला धक्का; सभापती पदाची संधी हुकली.. - MLA Rana Patil's group pushed in Osmanabad Municipality; Opportunity for the post of Speaker missed | Politics Marathi News - Sarkarnama

उस्मानाबाद नगर पालिकेत आमदार राणा पाटील गटाला धक्का; सभापती पदाची संधी हुकली..

सयाजी शेळके
गुरुवार, 28 जानेवारी 2021

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट समर्थक म्हणून कार्यरत आहे. गेल्या वर्षी सभापतीपदावर त्या गटाचे वर्चस्व होते. यावेळी मात्र महाविकास आघाडीने त्यांच्या वर्चस्वाला धक्का दिल्याचे दिसून आले.

उस्मानाबाद ः नगर पालिकेच्या सभापती निवडीमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांमध्ये दोन गट पडल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाला आघाडीतून वगळल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गुरुवारी नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या सभापती पदांच्या निवडीत शिवसेनेकडे तीन तर राष्ट्रवादीला दोन सभापतीपद मिळाले.

नगर पालिकेत एकूण ३९ नगरसेवक आहेत. यामध्ये राष्ट्रवादी  १७, शिवसेना ११, भाजप ८ तर  काँग्रेस दोन व एका अपक्षाचा समावेश आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या एका सदस्याचे निधन झाले आहे. त्यामुळे सभागृहात ३८ सदस्य आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट समर्थक म्हणून कार्यरत आहे. गेल्या वर्षी सभापतीपदावर त्या गटाचे वर्चस्व होते. यावेळी मात्र महाविकास आघाडीने त्यांच्या वर्चस्वाला धक्का दिल्याचे दिसून आले.

दरम्यान सभापतीपदावर वर्णी लावताना गटनेत्याच्या पत्राद्वारे अर्ज केले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटापैकी खरा गट कोणता अन खोटा कोणता याची चर्चा चांगलीच रंगली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर गणेश खोचरे यांची गटनेतेपदी निवड झाली. मात्र त्यास पूर्वीचे गटनेते युवराज नळे यांनी न्यायालयात आव्हान देत दाद मागितली.

गटनेते पद ठरले महत्वाचे..

सभापती निवडीच्यावेळी पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी काम पाहिले. नळे यांनी पीठासीन अधिकाऱ्यांकडे न्यायालयाचा निकाल सादर करत गणेश खोचरे यांच्या निवडीवर आक्षेप घेतला. मीच गटनेता असल्याचे सांगत सर्व कागदपत्र त्यांच्याकडे सादर केली. मात्र पीठासीन अधिकारी खरमाटे यांनी नळे याचे सर्व आक्षेप फेटाळून लावत गणेश खोचरेच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचे सांगत प्रक्रीया पूर्ण केली.

त्यामुळे आमदार पाटील समर्थक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सभापतीपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे सहाजिकच पालिकेच्या सभापतीपदावर महाआघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. आज झालेल्या निवडीमध्ये बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदिप घोणे, पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचेच बाबा मुजावर तर शिवसेनेकडून स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी राणा बनसोडे, सोनाली वाघमारे यांची महिला बालकल्याण सभापती तर सिद्धेश्वर कोळी यांची शिक्षण सभापतीपदावर बिनविरोध निवड झाली.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख