Vinayk mete, jaydatta kshirsagar news beed
Vinayk mete, jaydatta kshirsagar news beed

मेटे, क्षीरसागर यांचा रुसवा गेला, पदवीधरच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी सक्रीय..

शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी मराठवाडा पदवीधर निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नाराजीचे हत्यार उपसले होते. तर, शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर देखील आतापर्यंत प्रचारापासून दुर होते.

बीड : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत रुसवा धरुन बसलेले शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे आणि शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या दोघांनीही आपल्या नाराजीच्या तलवारी म्यान केल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला पाठींब्याचे पत्र शिवसंग्रामने शनिवारी काढले आहे. तर, रविवारी राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांच्यासाठी जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मेळावा आयोजित केला आहे. 

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील यंदाची निवडणुक रंगतदार स्थितीत आली आहे.  महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. विद्यमान आमदार असल्याने त्यांचा नियोजनबद्ध प्रचार आणि बैठका सुरु आहेत. त्यांच्या प्रचारात राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी झोकून दिले आहे. मात्र, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेले पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत असलेल्या राजकीय वैरामुळे शेवटपर्यंत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर प्रचारापासून दुरच होते.

सुरुवातीला दांड्या मारणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनीही नंतर सभांना हजेऱ्या लावल्या. पण, बीड शहरात मेळावा होऊनही जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर या मेळाव्याला हजर नव्हते. पण, आता त्यांनीही नाराजीची तलवार म्यान करुन रविवारी म्हणजेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला आहे. 

शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी तर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उघड नाराजी व्यक्त करत भाजपला मित्रपक्षांची गरज नाही, मित्रपक्षांना दुर ठेवणे हीच पदवीधर मतदार संघातील भाजपची रणनिती असल्याचे सांगत भाजप नेत्यांनाच शिरीष बोराळकर यांचा पराभव व्हावा वाटतो कि काय, अशी शंका उपस्थित केली होती. त्यांनी २५ तारखेचा अल्टीमेटम भाजपला दिला होता.

दरम्यान, शिरीष बोराळकरांच्या प्रचाराच्या बॅनरवर शेवटपर्यंत विनायक मेटे यांचा फोटो काही आला नाही. मात्र शनिवारी शिवसंग्रामनेही आपली तलवार म्यान करत पदवीधरसाठी भाजपला पाठिंब्याचे पत्र प्रदेश सरचिटणीस सुभाष जावळे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धीस दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांचे काम उत्तम असून राज्यात शिवसंग्रामला व विनायक मेटे यांना घटक पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस सन्मानाने सोबत घेत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या दोन्ही नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात असा यु टर्न का घ्यावा लागला आणि अचानक त्यांची नाराजी कशामुळे दुर झाली याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com