मराठवाडा पदवीधरच्या मतपत्रिकेवर मराठा आरक्षण, मोबाईल नंबर आणि स्वतःचे नावही..

पदवीधर निवडणुकीत गेल्यावेळी बाद झालेल्या मतांची संख्या पाहता यावेळी प्रशासनाकडून खास व्हिडिओ तयार करून त्यामध्ये मतदान कसे करायचे, पसंती क्रमांक कसा टाकायचा, कोणत्या भाषेत टाकायचा, चिन्हाचा वापर करायचा नाही, एकाचवेळी अनेक उमेदवारांना पहिली पंसती द्यायची नाही, मत कसे बाद होऊ शकेल या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती.
Marathawada Graduate Election counting news
Marathawada Graduate Election counting news

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये बाद मतांचेे प्रमाण या निवडणुकीत देखील अधिक असेल की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. सुरवातीला एकूण १ हजार २६० मतांची मोजणी होत आहे. पण या मतमोजणीमध्ये पदवीधर मतदारांनी मतपत्रिकेवर चक्क मराठा आरक्षण, माेबाईल क्रमांक, स्वतःचे नाव, राईटचे चिन्ह असे अनेक प्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या निवडणूकी प्रमाणेच यावेळी देखील बाद मतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी आठवाजेपासून सुरूवात झाली. चिकलठाणा एमआयडीसीतील मराठवाडा रियल्टर्स कंपनीत या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पोस्टल मतांच्या मोजणीला दुपारी साडेबारानंतर सुरूवात झाली. एकूण १२६० इतके पाेस्टल मतदान आहे. या मतमोजणीच्या सुरुवातीलाच काही प्रकार समोर आले आहेत.

यात प्रामुख्याने मतदारांनी मतपत्रिकेवर पसंती क्रमांक टाकण्याऐवजी मराठा आरक्षण, मोबाईल क्रमांक, स्वतःचे नाव, राईटच्या खुना केल्याचे प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पदवीधर हे सुशिक्षत असल्यामुळे त्यांचे मतदान बाद होणे अपेक्षित नसते. परंतु हा मुद्दामहून केलेला प्रकार असल्याचे बोलले जाते. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत देखील तब्बल बारा हजार मते बाद झाली होती. या निडणुकीत देखील त्याची  पुनरावृत्ती होते की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

पदवीधर निवडणुकीत गेल्यावेळी बाद झालेल्या मतांची संख्या पाहता यावेळी प्रशासनाकडून खास व्हिडिओ तयार करून त्यामध्ये मतदान कसे करायचे, पसंती क्रमांक कसा टाकायचा, कोणत्या भाषेत टाकायचा, चिन्हाचा वापर करायचा नाही, एकाचवेळी अनेक उमेदवारांना पहिली पंसती द्यायची नाही, मत कसे बाद होऊ शकेल या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. परंतु त्याचा किती फायदा झाला, हे संपुर्ण मतमोजणीची प्रक्रिया पार पडल्यावरच समोर येईल.

मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, त्यात सुप्रीम कोर्टात राज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याचा मराठा संघटनांकडून होत असलेला आरोप याचे पडसाद पदवीधर निवडणुकीच्या मतदानातून उमटण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. सुशिक्षत असलेल्या पदवीधरांनी पोस्टल मतपत्रिकेवर मराठा आरक्षणाचा उल्लेख करत आपला संतापच एका प्रकारे व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यामध्ये झालेल्या चुरसीच्या निवडणुकीत बाद होणाऱ्या मतांचा फटका कुणाला बसेल हे सायकांळपर्यंत स्पष्ट होईल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com