परभणी ः संपूर्ण जिल्ह्यात पुढाऱ्यांचे गाव म्हणून सातत्याने चर्चेत राहणाऱ्या परभणी तालुक्यातील जांब (रेंगे) या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसंग्राम ग्रामविकास पॅनलला चांगले यश मिळाले आहे. राजकारणात नवखे असणारे तथा माजी मंत्री (कै.) रावसाहेब जामकर यांचे नातू संग्राम जामकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने ही निवडणुक लढविली होती. त्यांच्या पॅनलचे १३ पैकी ११ उमेदवार विजयी झाले आहेत.
परभणी तालुक्यातील लक्षवेधी ठरलेली ही एक ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन पॅनल एकमेकांविरुद्ध मैदानात होते. यात आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच शिवसेनेत आलेले संग्राम बाळासाहेब जामकर व माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषदेच्या जांब गटाचे सदस्य बाळासाहेब रेंगे पाटील यांचे पॅनल होते. जांब ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतू त्यांच्या गटातील केवळ दोन जागेवरच यश मिळविता आले.
माजी मंत्री (कै.) रावसाहेब जामकर यांचे नातू संग्राम जामकर हे उच्च शिक्षित तरूण आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण परदेशात झालेले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परत परभणीत आल्यानंतर त्यांनी आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला.
संग्राम यांचे वडील अॅड.बाळासाहेब जामकर हे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आहेत. तसेच काका विजय जामकर हे देखील परभणी महापालिकेत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक आहेत. असे असतांनाही संग्राम जामकर यांनी स्वतःच्या बळावर ही निवडणुक लढवून पॅनलला दणदणीत विजय मिळवून देत आपल्यातील राजकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिली.
Edited By : Jagdish Pansare

