Due to the defeat of Sanjana Jadhav, Harshvardhan defeated Khaire. | Sarkarnama

याच संजना जाधव ज्यांच्या पराभवामुळे हर्षवर्धन यांनी खैरे यांना पाडले..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

संजना जाधव या रावसाहेब व निर्मला दानवे यांच्या तृतीय कन्या आहेत. आशा, उषा, संजना आणि संतोष ही बहिण भावंडे, या पैकी आशा या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूण आलेल्या आहेत, तर सर्वात धाकटे असलेले संतोष दानवे हे सलग दुसऱ्यांदा भोकरदन मतदारसंघातून विधानसभेवर निवडूण गेले आहेत.

औरंगाबादः हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या व्यक्तीमत्वाला साजेशी अशी भूमिका घेत आज पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाला सुरूवात केल्यानंतर अपक्ष, मनसे, शिवसेना आणि आता पुन्हा मनसे असा प्रवास केल्यानंतर जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. दोनदा कन्नड-सोयगांव मतदारसंघातून निवडूण आलेल्या हर्षवर्धन यांनी पत्नी संजना जाधव यांना देखील राजकारणात आणले.

पिशोर सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून संजना राजकारणात सक्रीय होत्या. गेल्या जि.प. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि तिथूनच हर्षवर्धन जाधव यांच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. संजना जाधव यांचे सासर आणि माहेर दोन्ही राजकारणात असल्यामुळे सहाजिकच त्यांचा ओढा देखील राजकारणाकडेच होता. हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी, स्व. माजी आमदार रायभान जाधव, तेजस्वीनी जाधव यांच्या सूनाबाई आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या अशी संजना जाधव यांची ओळख.

संजना जाधव या रावसाहेब व निर्मला दानवे यांच्या तृतीय कन्या आहेत. आशा, उषा, संजना आणि संतोष ही बहिण भावंडे, या पैकी आशा या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूण आलेल्या आहेत, तर सर्वात धाकटे असलेले संतोष दानवे हे सलग दुसऱ्यांदा भोकरदन मतदारसंघातून विधानसभेवर निवडूण गेले आहेत. तीन बहिणींपैकी उषा यांचा विवाह देखील परतूर येथील आकात या राजकीय घराण्यात झालेला आहे. राजकीय कुटुंबात असून देखील त्या राजकारणापासून लांब राहिल्या.

पण दानवे यांच्या जेष्ठ कन्या आशा पांडे आणि संजना जाधव यांनी मात्र आपले वडील, भाऊ यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात उडी घेतली. संजना जाधव यांचा हर्षवर्धन जाधव यांच्याशी विवाह झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी नाचनवेल सर्कलमधून जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक लढवली. जेमतेफ सात-आठ महिने काम करण्याची त्यांना संधी मिळाली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करतांनाच त्यांना कन्नड- सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास देखील पती आमदार असल्यामुळे जवळून करता आला.

जि.प.तील पराभवाची लोकसभेत परतफेड..

मतदारसंघातील अनेक समस्या संजना जाधव याच हर्षवर्धन यांच्या गैरहजेरीत सोडवायच्या, त्यामुळे त्यांचा संपर्क चांगलाच वाढला होता. सार्वजनिक समारंभामध्ये सहभागी होत त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला. पण गेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत पिशोर सर्कलमधून संजना जाधव यांचा अनपेक्षितपणे पराभव झाला. या पराभवामुळे संजना यांच्या सोबतच तेव्हा आमदार असलेल्या हर्षवर्धन जाधव यांना चांगलाच धक्का बसला होता.

तत्कालीन शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनीच आपल्या पत्नीचा पराभव घडवून आणला असा आरोप करत हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले होते. त्यानंतर खासदार निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत जाधव यांनी खैरेंच्या विरोधात मोहिमच उघडल्याचे दिसून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी थेट खैरेना आव्हान देत निवडणूक लढवली. जाधव यांना विजय मिळवता आला नसला तरी त्यांनी घेतलेल्या २ लाख ८३ हजारांमुळे खैरेंचा मात्र पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पत्नीला पराभूत करणाऱ्या खैरेंचा जाधव यांनी लोकसभा निवडणूकीत बदला घेतल्याचे बोलले जाते.

लोकसभा आणि विधानसभा अशा सलग दोन निवडणुकीत हर्षवर्धन जाधव पराभूत झाले. त्यानंतर काही महिने राजकारणापासून लांब राहिलेल्या जाधवांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या पक्षाकडून कमबॅक केले. पण काही महिने उलटत नाही तोच, जाधव यांनी राजकीय संन्यासाची घोषणा करत, पत्नी संजना जाधव यांना आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. आता संजना जाधव राजकारणात सक्रीय होऊन आपले वडील, भाऊ आणि पती प्रमाणे धडाकेबाज राजकारण करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख