बर्ड फ्लूमुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री व्यवसायिकांना भरपाई द्या : मुंदडा यांची मागणी - Compensate poultry traders affected by bird flu: Namita Mundada More about compensate | Politics Marathi News - Sarkarnama

बर्ड फ्लूमुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री व्यवसायिकांना भरपाई द्या : मुंदडा यांची मागणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 जानेवारी 2021

सुरुवातीला जिल्ह्यात कावळ्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर अंबाजोगाई तालुक्यात पाळीव पक्षांनाही (कोंबड्या) बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे समोर आले. 

बीड : आता अनलॉक आणि कोरोना विषाणूचा फैलाव ओसरत असतानाच जिल्ह्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट घोंगावू लागले आहे. याचा फटका पोल्ट्री फार्म चालकांना बसला आहे. संकटात सापडलेल्या पोल्ट्री फार्म चालकांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी पशुसंवर्धन मत्र्यांकडे केली आहे. दरम्यान मुंदडा यांचे पती अक्षय यांनी मुंबईत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन पोल्ट्री व्यवसायिकांना दिलासा देण्याची मागणी केली.

नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांची पोल्ट्री फार्म व्यवसायिकांनी भेट घेऊन कैफियत मांडली. मागच्या वर्षीही केवळ अफवांमुळे हा व्यवसाय पुर्णत: कोलमडून पडला. त्यामुळे या व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेकांनी उधार - उसणवारी आणि कर्जाऊ रकमा घेऊन व्यवसाय सुरु केलेला आहे. अशा काही अफवा आल्या कि विक्री मंदावते आणि अनेक वेळा बंद होते. 

एका विशिष्ट कालावधीनंतर या कोंबड्यांची वाढ थांबलेली असते आणि त्या काळात विक्री बंद झाली तर त्यांना खाद्य मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे हा सर्व व्यवसायच अनिश्चितते सापडलेला आहे. दरम्यान, मागच्या वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागले. या काळात सर्वच घटक संकटात सापडले. त्या काळातही पोल्ट्री व्यवसाय पुर्णत: कोलमडून पडला. आता कशीतरी नव्याने उभारी घेतली असतानाच जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू विषाणूचा संसर्ग आढळला आहे.

सुरुवातीला पाटोदा तालुक्यातील मुगगावला मेलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचे विषाणू आढळले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी या रोगाने कावळे मरण पावत आहेत. दरम्यान, आता पाळीव पक्षांमध्येही (कोंबड्या) बर्ड फ्ल्यू विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील काही ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने कोंबड्यांना दयामरणही दिले आहे. याचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या व्यवसायिकांची कैफियत जाणून घेऊन आमदार नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांनी निवेदन देऊन सरसकट भरपाईची मागणी केली.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख