जिंतूर-सेलूमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे, बोर्डीकर- भांबळे आमने सामने - BJP-NCP claims victory in Jintur-Selu, Bordikar-Bhamble face-to-face | Politics Marathi News - Sarkarnama

जिंतूर-सेलूमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे, बोर्डीकर- भांबळे आमने सामने

गणेश पांडे
सोमवार, 18 जानेवारी 2021

भाजपच्या जिंतूर येथील आमदार मेघना बोर्डीकर यांना बोरी (ता.जिंतूर) या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या व सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये धक्का बसला आहे. बोरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस प्रणित पॅनलकडे १४ तर भाजप प्रणित पॅनलला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे.
 

परभणी : जिंतूर विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीच्या झाल्या. बोर्डीकर आणि भांबळे गटातील या लढतीत बोर्डीकर गटाने बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिंतूर तालुक्यातील ८९ पैकी ६३ तर सेलू तालुक्यातील ४५ पैकी २४ ग्रामपंचायती बोर्डीकर गटाकडे आल्या असल्याचा दावा आमदार मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनीही सेलू तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे.

जिंतूर विधानसभा मतदार संघात बोर्डीकर - भांबळे गटाचे राजकारण नेहमीच चर्चेचा विषय असते. ही ग्रामपंचायत निवडणूकही याला अपवाद नव्हती. बहुतेक गावांमध्ये भाजपाच्या बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे भांबळे गटात अटीतटीचे सामने रंगले. तर काही गावांमध्ये चक्क बोर्डीकर समर्थकांच्याच दोन गटात निवडणूक रंगली. दोन्ही तालुक्यांतील २५ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत.

ऊर्वरीत ग्रामपंचायतींसाठी सोमवारी झालेल्या मतमोजणी नंतर जिंतूर तालुक्यातील ८९ पैकी तब्बल ६३ तर सेलू तालुक्यातील ४५ पैकी २४ ग्रामपंचायतीत बोर्डीकर गटाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे, असा दावा बोर्डीकर गटाकडून केला जात आहे. तर दुसरीकडे माजी आमदार विजय भांबळे यांनी सेलू तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. या दोन्ही नेत्यांनी केलेले दावे आगामी काही दिवसातच स्पष्टपणे समोर येतील.

दरम्यान, हा तरूणाईचा विजय असून आगामी काळातील राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल असल्याची प्रतिक्रिया  मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केली आहे. जीथे बहुमत हुकले आहे, अशा अनेक गावांमध्येही भाजपाच्या विचारांचे सरपंच निवडले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बोरीत भाजपला झटका..

भाजपच्या जिंतूर येथील आमदार मेघना बोर्डीकर यांना बोरी (ता.जिंतूर) या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या व सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये धक्का बसला आहे. बोरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस प्रणित पॅनलकडे १४ तर भाजप प्रणित पॅनलला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदार संघात मेघना बोर्डीकर यांचे कायम बोरी ग्रामपंचायतीकडे लक्ष असते. विशेष म्हणजे आमदार होण्याआधी मेघना बोर्डीकर या बोरी जिल्हा परिषद गटातून सदस्य म्हणून निवडुण येत असत. त्यामुळे या गटात त्यांचा दांडगा संपर्क आहे. परंतू बोरी गावात राष्ट्रवादी कॉग्रेसचे अजय चौधरी यांनी आपली बाजू भक्कपणे सांभाळली आहे. या गावात सर्वाधिक १७ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष असते.

आमदार मेघना बोर्डीकर व त्याचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी देखील ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. विद्या चौधरी या स्वत: या गावातील वार्ड क्रमांक चार मधून निवडणुक लढवित होत्या. त्याच वार्ड चार मधून डॉ. विद्या चौधरी यांच्यासह भाजपचे इतर तीन उमेदवार निवडून आले आहेत.

परंतू इतर १४ ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे  मेघना बोर्डीकरांना त्यांच्याच मतदार संघातील व जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये मोठा धक्का बसला आहे. परंतू या पूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बोर्डीकर गटाकडे केवळ दोन जागा होत्या. आता त्यात एका जागेची भर पडली असून त्या तीन झाल्या आहेत ऐवढेच काय ते समाधान म्हणावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख