पुण्याला पळवलेले क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच हवे :मुख्यमंत्र्यांना पत्र - Aurangabad wants sports university: Letter to CM | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्याला पळवलेले क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच हवे :मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

सदरील क्रीडा विद्यापीठाच्या प्राप्त जागे मधील गौणखनिज अवैद्य वाहतूक अडविण्याकरिता संरक्षण भिंती करीता माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना २७ जून २०१९ रोजी मागणी करण्यात आली. उपरोक्त घटना क्रमानुसार क्रीडा विद्यापीठासाठी जागा उपलब्ध झालेली असून सदरील क्रीडा विद्यापीठ लवकरात लवकर स्थापन करण्यात यावे.

औरंगाबाद ः गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून मंजुर झालेले औरंगाबाद येथील क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवण्यात आले. नुकत्याच झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात हे क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच व्हावी, अशी मागणी शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. पण अखेर हे क्रीडा विद्यापीठ पुण्यातील बालेवाडी येथे करण्याचा निर्णय झाला. परंतु हे क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला मंजुर झाले होते, त्यासाठी जागा देखील देण्यात आली, त्यामुळे क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच व्हावे, अशी आग्रही मागणी करणारे पत्र शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात दानवे यांनी या क्रीडा विद्यापीठासाठी केलेले प्रयत्न व पाठपुरावा याची सविस्तर माहिती दिली आहेे. ७  फेब्रुवारी २०१८ रोजी तत्कालीन क्रीडामंत्री, प्रधान सचिव, शिक्षण व क्रीडा यांच्यासमवेत आयुक्त क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्या बैठकीत बालेवाडी येथील सुविधा व्यतिरिक्त औरंगाबाद येथे दोन क्रिकेट मैदाने ,दोन फुटबॉल मैदाने, दोन ऑडिटोरियम, क्रीडा पदविका अभ्यासक्रम इमारत, क्रीडा ग्रंथालय इमारत, संशोधनासाठी स्वतंत्र इमारती, निवासी वस्तीगृह इत्यादी सुविधा निर्मिती करणे प्रस्तावित केले होते.

या प्रस्तावानुसार दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ रोजी  क्रीडा आयुक्त यांचे जागा मागणीसाठी पत्र औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ १२ फेब्रुवारी २०१८ रोजी करोडी येथील गट नंबर २२७ व २३५ मधील ७५ हेक्‍टर जागा उपलब्ध असल्याचे सांगितले. अप्पर तहसीलदार यांनी सदरील जागेच्या मागणीचा प्रस्ताव  २३ फेब्रुवारी २०१८ रोजी विहित नमुन्यात सादर केला होता. १७ मार्च २०१८ व २३ एप्रिल २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा आयुक्त यांना जागा उपलब्ध असल्याचे पत्र दिले. सदरील प्रस्तावातील त्रुटी संदर्भात २५ मार्च २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अप्पर तहसीलदार , दुय्यम निबंधक वर्ग १, सहाय्यक संचालक, नगररचना, मनपा उपअधीक्षक, भुमिअभिलेख या विभागांना पत्र देण्यात आले.

२९ मे २०१८ रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी ४३५००  मोजणी फीस भरली असून दिनांक १५ मे १०१८ रोजी गटविकास अधिकारी यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे पत्र ग्रामपंचायत स्तरावरील सगळ्या बाबींची पूर्तता करण्याचे पत्र देण्यात आले. दिनांक १० आॅगस्ट २०१८ रोजी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.  २८ आॅगस्ट  २०१८ रोजी ग्रामपंचायत करोडी तालुका जिल्हा औरंगाबाद  क्रीडा विद्यापीठास जागा देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.

२७ डिसेंबर २०१८ रोजी अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडून मोजणी नकाशा प्राप्त झाला व  ३ जून २०१९ रोजी गट क्रमांक १३५ मधील ४८ हेक्टर. आर. सरकारी जमीन जिल्हा प्रशासनाने क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी उपलब्ध करून दिली. सदरील क्रीडा विद्यापीठाच्या प्राप्त जागे मधील गौणखनिज अवैद्य वाहतूक अडविण्याकरिता संरक्षण भिंती करीता माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना २७ जून २०१९ रोजी मागणी करण्यात आली. उपरोक्त घटना क्रमानुसार क्रीडा विद्यापीठासाठी जागा उपलब्ध झालेली असून सदरील क्रीडा विद्यापीठ लवकरात लवकर स्थापन करण्यात यावे, असे देखील अंबादास दानवे यांनी या पत्रात नमूद केले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख