गेवराईत अमरसिंह - विजयसिंह पंडितांनी नवे गड ताब्यात घेतले - Amar Singh - Vijay Singh Pandit took possession of the new Victory in Gevrai | Politics Marathi News - Sarkarnama

गेवराईत अमरसिंह - विजयसिंह पंडितांनी नवे गड ताब्यात घेतले

दत्ता देशमुख
मंगळवार, 19 जानेवारी 2021

गेवराई तालुक्यातील मादळमोही, तलवाडा या महत्वाच्या नवीन ग्रामपंचायतीसह गढी अशा मोठ्या ग्रामपंचायतीचीही सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने कायम ठेवली. तालुक्यात राष्ट्रवादीने चमकदार कामगिरी केली.
 

बीड : गेवराई तालुक्यातील २२ ग्रामपंचातींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने चमकदार कामगिरी केल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी आखलेले डावपेच कामी आले. दोघांनीही विजयानंतर समर्थकांसह जल्लोष केला.

मादळमोही, तलवाडा व गढी या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत स्थानिक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत गेवराई तालुक्यातील स्थानिक राजकारणामुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीच आमने - सामने उभी ठाकली होती. राष्ट्रवादीने अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली मादळमोही, भडंगवाडी, जव्हारवाडी, कुंभारवाडी, गढी, डोईफोडवाडी, चव्हाणवाडी, गोविंदवाडी, तलवाडा, गंगावाडी, सुर्डी, चोपड्याचीवाडी आणि खेर्डावाडी आदी ठिकाणी घवघवीत यश मिळविले.

तालुक्यात १८६ सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी झाली. विजयानंतर पंडितांच्या गेवराईतील कृष्णाई निवासस्थानी अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित या दोन्ही बंधूंनी विजयी उमेदवारासोबत विजयाचा गुलाल खेळला. मादळमोही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक शिवसेना जिल्हा परिषद सदस्या कमल बप्पासाहेब तळेकर यांचा पराभव झाला. तर, तलवाडा ग्रामपंचायतीमध्ये अ‍ॅड. सुरेश हात्ते यांच्या पॅनलचा दारुन पराभव झाला.

मागील २५ वर्षांची त्यांची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उखडून टाकली. गढी ग्रामपंचायतींच्या सर्वच ११ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. भाजप आमदार लक्ष्मण पवार यांना इथे पॅनलही उभा करता आला नाही. निवडणुक निकालातही भाजपची कामगिरी सुमारच दिसली.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख