IAS तुकाराम मुंढे यांचा सामना आता तेवढ्याच फटकळ गुलाबराव पाटलांशी - IAS tukaram mundhe now have to face minister gulabrao patil who same arrogant as him | Politics Marathi News - Sarkarnama

IAS तुकाराम मुंढे यांचा सामना आता तेवढ्याच फटकळ गुलाबराव पाटलांशी

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

मुंढे हे ज्या विभागात जातात तेथे त्यांचे नेत्यांशी खटके उडतात....

पुणे : कठोर व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्तपदावरून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून बदली झाल्याने त्यांचा सामना शिवसेनेचे फारयब्रॅंड नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी होणार आहे.

मुंढे यांच्या 15 वर्षांतील प्रशासकीय कारकिर्दतील पंधराव्या बदलीचा आदेश काल जारी झाला. नागपूर येथे ते जेमतेम सहा महिने काम करू शकले. नेत्यांशी त्यांचे जमत नाही, असा नेहमीच त्यांच्याबद्दल तक्रारीचा सूर असतो. आता जीवन प्राधिकणारत तर पाटील आणि मुंढे या दोघांना एकत्र काम करावे लागणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार म्हणून या प्राधिकरणाची प्रमुख जबाबदारी आहे. नगरपालिका आणि मोठ्या गावांतील पाणीपुरवठा योजनांचे काम मार्गी लावण्याचे काम या प्राधिकरणाकडे आहे. ग्रामीण भागातील पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या योजनेचे काम हे प्राधिकरण करते.

नाशिक पालिका आयुक्तपदावरून त्यांची नियोजन विभागात बदली झाली तेव्हा तर तत्कालीन अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्याशी त्यांचे फार जमू शकले नाही. मुंढे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना तेथील पालकमंत्री विजय देशमुख हे त्यांच्याबद्दल तक्रारी करत होते. त्यांनी पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर या महापालिकांत काम केले. तेथील नेत्यांनी मुंढेबद्दल नेहमीच नाराजीचा सूर लावला.

Posted by Sarkarnama on Wednesday, August 26, 2020

आता मुंढेंना गुलाबरावांशी समन्वय ठेवून काम करावे लागणार आहे. गुलाबरावही बोलण्यासाठी आक्रमक आणि फटकळ म्हणून ओळखले जातात. मुंढे हे ज्या प्रमाणे अतिशय गरिबीतून शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी झाले तसेच गुलाबरावही हलाखीच्या परिस्थितीतून मंत्रिपदावर पोहोचले आहेत. ते 1999 मध्ये तेव्हाच्या एरंडोल मतदारसंघातून प्रथम आमदार झाले. 2009 ते 2014 चा अपवाद वगळता ते आमदार राहिले आहेत. आता ते जळगाव ग्रामीण या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.  ते भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये 2016 मध्ये पहिल्यांदा सहकार राज्यमंत्री झाले. त्यानंतर 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठा विभागाचे कॅबिनेटमंत्री झाले. आधीच्या पिढीतीली शिवसैनिकांकडे असलेला तापटपणा त्यांच्याकडेही भरपूर आहे. त्यामुळेच या दोघांची जोडी कशी जमणार, याची उत्सुकता आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख