पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल केंद्रात जाणार? प्रतिनियुक्तीसाठी केला अर्ज - DGP Subhod Jaiswal Applies for central deputation | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल केंद्रात जाणार? प्रतिनियुक्तीसाठी केला अर्ज

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

जैस्वाल यांचा अर्ज स्वीकारला गेला तर त्यांच्या जागी कोण येणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे...

मुंबई : राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सुरू असलेले वादळ शमण्याचे अद्याप चिन्ह दिसत नाही. या आणि अन्य काही मुद्यांवरून राज्य सरकारशी मतभेद झाल्याने पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी अर्ज केल्याची माहिती मिळत आहे. त्यास अधिकृत सूत्रांकडून अद्याप दुजोरा मिळाला नसला तरी पोलिस खात्यात त्या विषयी चर्चा सुरू आहे.

जैस्वाल यांची नियुक्ती फडणवीस सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती. त्यानंतर राजकीय घडामोडी होऊन महाविकास आघाडी सरकार आले. त्याच वेळी जैस्वाल यांचे सरकारशी पटणार का, याची शंका येत होती. त्यामुळेच जानेवारी 20 मध्ये त्यांचे नाव नवी दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदासाठी चर्चेत आले होते. मात्र तेथे त्यांची नियुक्ती न झाल्याने त्यांना महाराष्ट्रातच राहावे लागले. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सत्ताधारी तीन पक्षांत अनेक नावांवरून बरेच लाॅबिंग झाले होते. त्यात राजकीय वशिला लावल्यास मी बदल्या करणार नाही आणि वेळ पडल्यास रजेवर जाईल अशी भूमिका जैस्वाल यांनी घेतली होती. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. बहुतांश बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला. जैस्वाल यांना पसंत नसलेली नावेही चांगल्या पोस्टिंगवर आली. 

जैस्वाल यांना निवृत्तीसाठी अद्याप दीड वर्षे बाकी आहेत. त्यामुळे पुढील दीड वर्षे ही मतभेदांत घालविण्याऐवजी आपणच दिल्लीला निघून जावे, असे त्यांनी ठरविले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जैस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस महासंचालक होण्याआधी ते मुंबईचे पोलिस आयुक्त होते. तेलगीने केलेल्या मुद्रांक घोटाळ्यात त्यांनी अनेक नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त रणजित शर्मा यांना अटक करण्याचेही काम त्यांनी केले होते.

जैस्वाल यांची अशी पार्श्वभूमी असल्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ते निवृत्तीपर्यंत पदावर पुढे राहणार की नाही, याची शंका आधीपासूनच व्यक्त केली जात होती. ती आता खरी ठरली आहे. ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर राज्यात पुन्हा अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख