राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे 31 मार्चपर्यंत होते लोकलचे नियमित प्रवासी - DGP Sanjay Pandey was a regular commuter of local train till March 31 | Politics Marathi News - Sarkarnama

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे 31 मार्चपर्यंत होते लोकलचे नियमित प्रवासी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

असे उदाहरण विरळेच

पिंपरीः  राज्याचे नुकतेच पोलिस महासंचालक (डीजीपी) झालेले संजय पांडे हे अत्यंत साधे व नम्र अधिकारी म्हणून परिचित आहेत. पण, त्यांचा एक वेगळा पैलूही आहे. ३४ वर्षे सेवा होऊनही हे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आतापर्यंत म्हणजे ३१ मार्चपर्यंत लोकलने प्रवास करीत होते. १ एप्रिलला त्यांचा रेल्वेचा मासिक पास संपला.

९ एप्रिलला डीजीपी होण्यापूर्वी ते याच दर्जाच्या पदावर राज्य सुरक्षा महामंडळात व त्याअगोदर राज्य गृहरक्षक दलाचे महासंचालक तथा डीजी होते. तोपर्यंत त्यांनी लाल दिव्याच्या शासकीय गाडीचा वापर टाळला होता. डीजी वा ज्येष्ठ आयपीएस असल्याचा कसलाच बडेजाव न करता ते मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकलचे (प्रथम वर्ग) नियमित प्रवासी होते. त्यासाठी ते मासिक पास काढत होते. रहायला ते वर्सोवा येथे आहेत. त्यामुळे लोकलचा प्रवास सोईस्कर पडत होता व पडतो आहे, असे त्यांनी `सरकारनामा`शी संवाद साधताना सांगितले.

दुसरीकडे मुंबईतील साधा फौजदारही कारने प्रवास करीत आहे. सचिन वाझेसारख्या वादग्रस्त अधिकाऱ्याच्या गाड्या मोजण्याची वेळ आली आहे.  त्यात संजय पांडे यांचा हा लोकल प्रवास नक्कीच वेगळावाटतो. त्यांच्या या साधेपणातून राज्याचे डीजीपी राहिलेले अरविंद ईनामदार या अधिकाऱ्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पांडे यांनी ज्येष्ठ अभिनेता आमीर खान याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमात पोलिस दलाबाबत दिलेली मुलाखत सोशल मिडियात पुन्हा व्हायरल झाली आहे. पोलिस दलातील भ्रष्टाचार कसा चालतो, हे त्यांनी स्पष्टपणे यात सांगितले होते. त्याची साखळीही उलग़डून दाखवली होती. इतके स्पष्टपणे बोलणारे फारच कमी अदधिकारी आहेत.

१९८६ च्या आय़पीएस बॅचच्या महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेले पांडे हे राज्यातील आयपीएसमधील सगळ्यात ज्येष्ठ अधिकारी आहेत. तरीही गॉडफादर नसल्याने व शांत व साध्या स्वभावामुळे त्यांच्यावर आतापर्यंत अनेकदा अन्यायच झालेला आहे. महत्वाच्या पदांवर डावलण्यात आल्याने त्यांचे सगळे करियरच दुय्यम ठिकाणीच त्यांना काम करण्यात गेले आहे.पण, अॅंटिलिया तथा सचिन वाझे आणि परमबीरसिंह प्रकरण उघडकीस आल्याने अखेरीस ते राज्याच्या सर्वोच्च पोलिस पदावर पोचले. तोपर्यंत त्यांचा लोकल प्रवास सुरु होता. त्याबाबत ते म्हणाले,लोकल प्रवासाचा अनुभव खूप चांगला आहे. लोकलचे प्रवासी खूप सहकार्य व मदत करतात. वयस्करांना ते बसण्यासाठी जागा देत औदार्य व  शिस्त दाखवतात. त्यातून मुंबईचे कल्चर दिसते.ही,खरं,मुंबईची संस्कृती आहे. त्यामुळे मी सुद्धा गेली काही वर्षे लोकलचा नियमित प्रवासी आहे. ३१ मार्चला मी शेवटचा लोकलने अंधेरी ते चर्चगेट व पुन्हा परत असा प्रवास केलेला आहे. डीजीपी झालो, तरी सोईचा असल्याने लोकलचा प्रवास पुन्हा करणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख