20 जून रोजी अस काय घडलं की ज्यामुळे एकनाथ शिंदेंची सटकली आणि ठाकरेंची खुर्ची गेली...

Eknath Shinde यांच्या बंडाला याच दिवशी सुरवात झाली होती...
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चार जुलै रोजी बोलताना अनेक बाबी मनापासून सांगितल्या. काही लपवल्या तर काही अर्धवट सांगितल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खुर्ची खाली खेचून झाल्यानंतर त्यांनी आपल्या बंडाची (त्यांच्या शब्दांत उठावाची) कारणे सांगितली. त्यात 20 जून ही तारीख महत्वाची ठरली. याच दिवशी ते तब्बल 30 आमदारांना घेऊन त्यांनी सुरतचा रस्ता धरला होता.

``त्या दिवशी माझी सरकली होती. मी कुठे चाललो आहे, हे माझे मला माहीत नव्हते. मी निघाल्यानंतर कोकणच्या पोलिस महानिरीक्षकांना सांगून नाकाबंदी करण्यात आली होती. पण ती कशी फोडायची हे मला माहीत होते,``अशी वाक्ये त्यांच्या भाषणात होती.

शिंदे यांची 20 जून रोजी का सटकली होती, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता विविध माहिती पुढे आली. 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होती. याच दिवशी भाजपने आपले पाचही उमेदवार निवडून आणले. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार दगाफटका न झाल्याने निवडून आले, अशा प्रमुख घटना या दिवशी घडल्या. पण त्या आधी अनेक नाट्यमय घटना घडल्या होत्या.

ठाकरे विरुद्ध शिंदे असा सुप्त तणाव आधीपासून होता. विशेषकरून शिंदे यांच्या नगरविकास खात्यात आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांचा हस्तक्षेप होत होता. त्यावरूनही धुसफूस सुरू होती. तिला तोंड फुटले ते राज्यसभा निवडणुकीच्या तयारीच्या वेळी. छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी मागितली तेव्हापासून खरे नाट्य सुरू झाले. संभाजीराजे यांच्याशी शिवसेनेकडून बोलणी करणाऱ्यांमध्ये शिंदे यांचा समावेश होता. संभाजीराजेंना सेनेच्या कोट्यातून तिकिट देण्यासाठी शिंदे अनुकूल होते. मात्र त्यांचे मत डावलले गेले. संभाजीराजे नाराज झाले. शिंदेंनी आपले मत काही ओठांवर येऊन दिले नाही. त्यानंतर सेनेने कोल्हापूरातून संजय पवार या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवार दिली. त्या निवडणुकीची जबाबदारी शिंदेंकडे होती. संजय पवार यांना निवडून आणण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता. पण सेनेला धक्का बसला आणि पवारांचा पराभव झाला. शिंदेंनी पवारांसाठी काही मतांची व्यवस्था केली होती. पण ती पुरेशी ठरली नाही. शिवसेनेकडे अपक्ष आमदारही या वेळी सोबत होते. तरी पवार यांना पुरेशी मते का मिळाली नाहीत, याचा रोष शिंदे यांच्याकडे गेला. शिंदे हे पराभवासाठी `व्हिलन` ठरले.

त्यानंतर दहाच दिवसांनी म्हणजे 20 जून रोजी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान झाले. राज्यसभेत एकनाथ शिंदे हे यशस्वी न झाल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीची सूत्रे मग दुसऱ्या फळीतील खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, सुनील प्रभू यांच्यासारख्या नेत्यांकडे देण्यात आली. या निवडणुकीच्या रणनीतीत शिंदे यांना स्थान नव्हते. या वेळी देखील शिवसेनेचे सर्व आमदार हाॅटेलमध्ये ठेवावे लागले होते. शिंदे यांना काहीच विचारले जात नाही, ही बाब आमदारांच्या लक्षात आली. त्यावरून तेथेच वाद झाला. मतदानाच्या दोन-तीन दिवस आधीच शिंदे नाराज असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रकाशित झाल्या. मात्र सारे आलबेल असल्याचे सेनेचे नेते सांगत होते. प्रत्यक्षात शिवसेनेतील काही मतांविषयी सेना नेतृत्वाला खात्री नव्हती, हे मतदानाच्या दिवशी स्पष्ट झाले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाने सारेच चकीत; अश्रू, हशा, टाळ्या आणि गुपितं फोडणारी वाक्ये

मतदानाचा 20 जूनचा दिवस उजाडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले. त्या वेळी त्यांचा एक व्हिडीओ नंतर व्हायरल झालेला अनेकांना पाहिला असेल. या व्हिडीओत मुख्यमंत्री विचारतात की एकनाथला सर्व सांगितले आहे ना! त्यांच्या या उत्तरावर तेथे शेजारी असलेले नेते हो म्हणून उत्तर देतात. मुख्यमंत्री विधानभवनातील आपल्या दालनात जातात. तेथे नेहमीच्या जवळच्या लोकांचे कोंडाळे जमलेले असते. दोन दिवस आधीपासूनच थोडे संतप्त असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तेथे काही वेळानंतर येतात. मात्र त्यांना मुख्यमंत्री भेटत नाहीत. शिंदे आल्याचा निरोप मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेला असूनही ते भेटत नाहीत, याचा अर्थ शिंदे यांच्या लक्षात आला आणि त्यांची सटकली. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार वरुण सरदेसाई यांनी त्यांना अडवलं आणि सीएमना आताच भेटू नका, असे सांगितले. त्याच वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दुसरे मंत्री आले आणि ते थेट मुख्यमंत्र्यांना भेटायलाही गेले. ते मंत्री बाहेर आले तरी शिंदे बाहेरच उभे होते.

शिंदेंनी काय समजायचे समजून गेले. आतापर्यंत साठलेलं बाहेरं पडण्याची वेळ झाली. काही न बोलता तेथून ते निघाले. त्यांनी आपल्या आमदारांना निरोप पाठवला. शिवसेनेचे उमेदवार आमशा पडवी आणि सचिन अहिर यांना मतदान करा. संध्याकाळी आपल्याला भोजनासाठी आणि बाहेरगावी जाण्यासाठी भेटायचे आहे. तयारीत राहा, असा निरोप पाठवला. दुपारनंतर शिंदे गटाच्या आमदारांनी बॅगा भरल्या आणि सुरतेचा रस्ता धरला. काही आमदार हे शिंदेंसोबत राज्याबाहेर जात असल्याचा निरोप उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचला होता. पण तो पर्यंत उशीर झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com