
मुंबई : शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आम्ही काहीही बोलणार नाही. आमच्यासाठी बाळासाहेब हे कायम वंदनीयच राहतील. पण ‘मी धूर्त आहे,’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतःच कबूल केले, हे बर झालं. आमची मात्र फसगत झाली. आम्ही त्यांना भावासारखं मानलं. मात्र, ते धूर्त होते, हे कळायला आम्हाला थोडा उशीरच झाला. त्यामुळेच त्यांनी धूर्त पद्धतीने आमच्याबरोबर मत मागितली आणि सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं. हा धूर्तपणा त्यांनी कबूल केला, हे एका अर्थाने बरं झालं, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार (Ashish shelar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला. (We treated them like brothers; But they treated us cunningly : Ashish shelar)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत ‘बाळासाहेबांच्या भोळ्या स्वभावाचा भाजपने गैरफायदा घेतला. मी मात्र तसा नसून धूर्त आहे,’ असे वक्तव्य केले होते. त्यावर आशिष शेलार बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भाजप काहीही बोलणार नाही. ते आमच्यासाठी वंदनीय होते आणि राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मात्र आमची फसगत झाली आहे.
राणा दांपत्यावरील कारवाई संदर्भात बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, सुडबुद्धीने केलेल्या कारवाईला आमचा विरोध असणार आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी भाजपवर तुटून पडा, असे आदेश शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला आहे, त्याचा अर्थ काय होतो, असाही सवाल त्यांनी विचारला आहे. टोमणे मारणे, कुजकट बोलणे हे मुख्यमंत्री पदाला शोभत नाही. आम्ही मात्र त्यांना टोमणे मारणार नाही.
असुद्दीन ओवैसींच्या भाषणावर न्यायालय कसे काय गप्प बसते, असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला. तसेच, स्मार्ट सिटी थोतांड असेल तर मग ब्रिमस्टोवॅड काय आहे. बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली, असा दावा करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर शेलारांनी टीका केली. ते म्हणाले की, बाबरी मशिद पाडल्याची जबाबदारी रामसेवकांनी घेतली. पण, बाबरी आम्ही पाडली म्हणणाऱ्या शिवसैनिकांच्या नावावर केसेससुद्धा नाहीत. संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बाबरीशी काय संबंध. राऊत, तुम्हाला इतिहाससुद्धा माहिती नाही. अयोध्येवर आज बोलणारे नेते तेव्हा गोधडी ओली करत होते. मुंबईकरांवर हल्ला करणाऱ्यांसोबत सध्या तुमचे आईस्क्रीम खाणे सुरू आहे, असा टोलाही शेलार यांनी या वेळी केला.
राज ठाकरे यांच्या भाषणावर होत असलेल्या टीकेबाबत शेलार यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादीच्या घड्याळाची काटे बंद पडले आहेत. चिथावणी भाषाच बघायची असेल तर मग शिवसेना पक्षप्रमुखांचीही भाषणे तपासयाला हवीत. त्यांचा नावाने साधी एक ‘एनसी’ तर आहे का. शिवसेनेच्या नेत्यांचा बुद्धीदोष झाला आहे. पंतप्रधान देशहिताचं काम करत आहेत. राजकारण तुमच्या डोक्यात घुसलेली घाण आहे. ती आधी दूर करा, असा सल्लाही शेलारांनी शिवसेना नेत्यांना दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.