मुनगंटिवारांचे खळबळजनक विधान; शिवसेना फिरसे लौट आयेगी

'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुनंगटिवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चितपणे पडणार असल्याचे सांगितले.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwarsarkarnama

पुणे : महाविकास आघाडीसोबत शिवसेनेचा कोणताही नेता सुखी नाही. एकटे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) खूष आहेत. त्यामुळे आज ना उद्या शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल, असा विश्वास भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटिवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला. (Sudhir Mungantiwar said on Shiv Sena-BJP alliance)

'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुनगंटिवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चितपणे पडणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याची वेळ सांगता येत नसल्याचे त्यांनी म्हटले. जनमताच्या विरोधात सत्तेत आलेले सरकार आहे. दगफटका करून महाविकास आघाडी सत्तेत आली असून, अशा आघाडीचे सरकार फार काळ टिकत नसते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आज ना उद्या शिवसेना भाजप सोबत येईल. शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत. भाजप आणि शिवसेनेचे २५ वर्षांची युती आहे, असे त्यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar
रामदास आठवले यांनी सांगितला भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला...

महाविकास आघाडी सरकारवर मुनगंटिवार यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ''सर्व पातळ्यांवर अयशस्वी ठरलेले हे सरकार आहे. दारू दुकांनांच्या परवाना शुल्काला सवलत देण्यासाठी या सरकारकडे पैसे आहेत. मात्र, कोरोनाकाळात सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पैसे नसलेले सरकार आहे. या सरकारच्या काळात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणे अतिशय कठीण झाले आहे.''

यावेळी मुनगंटिवार म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे. हा कोणत्या कुटुंबाचा नव्हे तर सर्वांचा पक्ष आहे. इथे पदासाठी नव्हे तर देशसेवा म्हणून कार्यकर्ते काम करीत असतात. त्यामुळे भविष्याचा विचार करून संघटनेचे काम सुरू असते. त्यामुळे २०४७ मध्येही भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाचा स्वातंत्रदिन भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान साजरा करील, असे त्यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar
रजनी पाटील यांचा अर्ज भरताना रंगली एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीची चर्चा

आपण मुख्यमंत्री होण्याच्या क्षमेतेचे असूनही आपणास डावलले जात असल्याची काही लोकांची भावना आहे. या प्रश्‍नावार बोलताना मुनगंटिवार म्हणाले, ''आमच्या पक्षात पदासाठी कुणीच काम करीत नाही. तरूणांना संधी देण्याचे आमच्या पक्षाचे धोरण आहे. देवेंद्र फडणवीस हे माझ्यापेक्षा अधिक तरूण आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मला डावलण्याचा प्रश्‍नच येत नाही. भविष्याचा विचार करून संघटना बांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट २०४७ च्या स्वातंत्र्य दिना दिवशीदेखील भाजपचा पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावरणार यात मला कोणतीच शंका वाटत नाही.''

''आमच्या पक्षात परिवारवादाला कसलेच स्थान नाही. राज्यातले आणि देशातले सर्व प्रमुख पक्ष परिवारावर अवलंबून आहेत. अपवाद फक्त भारतीय जनता पार्टीचा आहे. आमचा पक्ष केवळ विचारावर चालणारा आहे. एकत्रित निर्णय प्रक्रिया हे आमच्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे,'' असे मुनगंटिवार यांनी सांगितले.

याच बरोबर भाजपसाठी 2014 च्या निवडणुकीत राज्यात पाच चेहरे होते. त्यातील देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटिवार हेच चेहरे राज्यात अॅक्टिव्ह आहेत. त्यातील पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचे मौन का आहे, यावर सुधीर मुनगंटिवार यांनी भाष्य केले.

मला अर्थमंत्री होऊ द्या, वीस रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो, असा दावा मुनगंटिवार यांनी केला. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले तर पेट्रोलचे दर वीस रुपयांनी कमी करून दाखवतो, असेही ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला निर्णय घेता येत नसल्याने पेट्रोलचे दर चढे असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विधान परिषदेवर बारा आमदारांची नियुक्ती न करण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्य, असल्याची भूमिका मुनगंटिवार यांनी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com