मुलांनी विलासरावांना रात्री १ वाजता फोन केला अन् सकाळी वसतिगृहाला ४६ लाख मंजूर झाले

Vilasrao Deshmukh | शेतकरी, सर्वसामान्य लोक, कार्यकर्ता यांना सहज संपर्क होवू शकणारा मुख्यमंत्री म्हणून विलासरावांनी ओळख मिळवली होती.
मुलांनी विलासरावांना रात्री १ वाजता फोन केला अन् सकाळी वसतिगृहाला ४६ लाख मंजूर झाले
Vilasrao DeshmukhSarkarnama

राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची त्यांच्या विरोधकांपासून आजही सर्वपक्षीय नेते आवर्जून आठवण काढतात. त्यांच्या दिलदारपणाचे, त्यांच्या मैत्रीचे, त्यांच्या निर्णयाचे, त्यांच्या मदतीचे अनेक किस्से सांगितले जातात. सोबतच विलासरावांचे फोनवरुन किंवा पोस्टकार्डवरुन समस्या सोडवण्याचे अनेक किस्से देखील प्रसिद्ध आहेत. शेतकरी, सर्वसामान्य लोक, कार्यकर्ता यांना सहज संपर्क होवू शकणारा मुख्यमंत्री म्हणून विलासरावांनी ओळख मिळवली होती. असं म्हणतात की लातूरमधील लोकं अगदी रस्त्यावर पोलिस हवालदाराने अडवलं तरी थेट विलासरावांना फोन करतं असे आणि आपली सुटका करवून घेत असे.

विलासराव देशमुख यांचा विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची समस्या केवळ एका फोनवरुन सोडवण्याचा असाच एक किस्सा त्यांच्या जयंतीनिमित्त मनसे नेते गजानन काळे यांनी सांगितला आहे. विद्यार्थी चळवळीत असताना मागासवर्गीय मुलांच्या वरळी हॉस्टेलमध्ये सोयी सुविधा मिळत नसल्याची तक्रार एकदा गजानन काळे यांच्यापर्यंत आली. या तक्रारीची दखल घेत काळे रात्री १२ वाजताच सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन हॉस्टेल बाहेर आंदोलनाला बसले. मोठ्या आवाजात घोषणा, जोरात निदर्शनं सुरु झाली. पण आता केवळ घोषणा आणि निदर्शनांनी जमणार नव्हते. काय करावे असा विचार सुरु असतानाच अखेरीस रात्री १ वाजता हिंमत करून गजानन काळे यांनी मुख्यमंत्री असलेल्या विलासरावांना कॉल केला.

रात्री १ वाजता मुख्यमंत्री फोन उचलतील की नाही आणि उचललाचं तर बोलतील की नाही याबाबत शंका होती. पण विलासरावांनी चक्क कॉल घेतला आणि विद्यार्थ्यांशी बोलले. त्यानंतर तात्काळ सूत्र फिरली. मुलांना त्या वेळचे सामजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा फोन आला, आणि सकाळी मंत्री स्वतः हॉस्टेलमध्ये आले. समस्या समजून घेतल्या, सोयी-सुविधा पाहिल्या आणि लगेचच वरळी हॉस्टेलला ४६ लाख रुपये मंजूर झाले.

यानंतरही अनेक आंदोलनात विलासरावांना फोन आले. कधी काम व्हायची तर कधी व्हायची नाहीत. पण फोन घेणारा आणि बोलणारा मुख्यमंत्री ही त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला कायम राहिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in