शिवसेनेसाठी आजचा दिवस मुख्यमंत्री पदाइतकाच महत्वाचा आहे....

दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९६६ साली लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय.
Shivsena first MLA
Shivsena first MLA sarkarnaam

मुंबई : आज राज्याच्या सत्तेवर आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर शिवसेना (Shivsena) पक्ष आहे. राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कारभार पाहत आहेत. त्यामुळेच दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९६६ साली लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. पण शिवसेनेला हे यश काही एका रात्रीमध्ये मिळालेले नाही. या यशाची खरी सुरुवात झाली होती ती आजच्याच दिवशी बरोबर ५१ वर्षांपूर्वी, म्हणजे २० ऑक्टोबर १९७० या दिवशी. कारण या दिवशी शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक हे विधानसभेवर निवडून गेले होते.

१९६६ साली मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी, मराठी अस्मितेसाठी, भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सुत्रानुसार शिवसेनेचे काम सुरु झाले. मात्र त्यावेळी असे म्हंटले जायचे की या पक्षाला काँग्रेसच्या काही नेत्यांचा आतून पाठिंबा होता. मुंबईत वाढलेल्या कम्युनिस्ट कामगार चळवळीवर वचक राहावा यासाठी शिवसेना वाढेल याकडे त्यांचे प्रयत्न असायचे. त्यामुळे डाव्या संघटनाशी थेट भिडायचा आदेश त्यांनी आपल्या शिवसैनिकांना दिला होता.

Shivsena first MLA
१९९२ च्या दंगलीत शिवसेना नसती तर आज टीका करणारे दिसले असते का?

१९६७ साली शिवसेनेने ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली आणि सर्वाधिक जागाही जिंकल्या. १९६८ साली मुंबई महापालिका निवडणूक झाली. इथे ही शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. याच दरम्यान शिवसेना विरुद्ध कम्युनिस्ट संघर्ष अधिक तीव्र झाला. लालबाग-परळ, गिरणगावात कम्युनिस्टांना मानणारा मोठा वर्ग होता. हाच जोर शिवसेनेने कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक दिवस अचानक कम्युनिस्ट नेते आणि परळचे आमदार कृष्णा देसाई (Krushna Desai) यांची हत्या झाली. शिवसेना कम्युनिस्टांमधला संघर्षामुळे त्यांच्या हत्येची सुई शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आली. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील हे आरोप कोर्टात टिकले नाही.

कृष्णा देसाईंच्या निधनानंतर कम्युनिस्टांकडून परळच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सरोजिनी कृष्णा देसाई यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेने देखील ताकदीने वामनराव महाडिक यांना आपला उमेदवार म्हणून मैदानात उतरवले. बाळासाहेब ठाकरेंची तुफान लोकप्रियता आणि मराठी माणसाला घातलेली साद या जोरावर शिवसैनिकांनी प्रचार केला. इथे त्यावेळी एकूण ६२ हजार ६२२ मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला. अखेर २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता निवडणुकीचा निकाल लागला. यात वामनराव महाडिक यांना ३१ हजार ५९२ मत मिळाली, तर सरोजिनी देसाईंना २९ हजार ९१३ मत मिळाली आणि महाडिक यांनी अवघ्या १६७९ मतांनी सरोजिनी देसाई यांचा पराभव केला.

Shivsena first MLA
किरीट सोमय्याही वामनराव परबांच्या वाटेवर.... दोघांनाही सेनेशी पंगा नडला! 

याच विजयासह शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत पोहचला. परळमधून पक्षाने विधीमंडळाच्या राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यामुळेच शिवसेनेसाठी आजचा म्हणजे २० ऑक्टोबरचा दिवस महत्त्वाचा आहे.

कॉ. कृष्णा देसाई कोण होते?

कॉ. कृष्णा देसाई हे लालबाग परिसरात कामगारांच्या मुलांसाठी व्यायाम शाळा, वाचनालय, नाट्यस्पर्धा, शाहिरी, सांस्कृतिक उपक्रम राबवित असल्याने जनसामान्यांत बरेच लोकप्रिय होते. क्रांतिकारी समाजवादी पक्षातुन काम सुरू करत त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या कामामुळे आणि लोकप्रियतेमुळे ब्रिटिशांच्या तुरुंगात असतानाही स्थानिक जनतेने त्यांना मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. पुढे त्या पक्षाशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे, ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे व गिरणी कामगार युनियनचे काम करू लागले.

गिरणी कामगार युनियनचे ते उपाध्यक्षही होते. त्या युनियनने कम्युनिस्टांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य लढे, संप, संघर्ष करून केवळ मुंबईतीलच नव्हे, तर देशभरातील सर्व कामगार कष्टकरी व कर्मचाऱ्यांना ८ तासांचा कामाचा दिवस, योग्य वेतनाची हमी, महागाई भत्ता, बोनस, प्रॉव्हिडंट फंड, आजारपणाची रजा असे अनेक कायदेशीर अधिकार मिळवून दिले. गिरणी मालक व देशातील भांडवलदार उद्योगपतीकडून नफ्यासाठी कामगार आणि कष्टकऱ्यांच्या सुरु असलेल्या शोषणाला संघटनेच्या लढाऊ एकजुटीने लढा देत सरकारला कामगार हिताचे कायदे करणे भाग पाडले.

गिरणी कामगारांनी कॉ. कृष्णा देसाई यांना पुन्हा नगरसेवक व १९६७ ला आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर पाठवले. त्यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत व गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय सहभाग होता. कॉम्रेड कृष्णा देसाई हे केवळ लढाऊ कामगार नेतेच नव्हते, तर एक स्वातंत्र्य सैनिक म्हणूनही त्यांची ओळख होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com