पवारांनी दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंचा हात स्वतः वर केला... त्यानंतर इतिहास घडला!

महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ते स्थापन करताना अनेक नाट्यपूर्ण घटना घडल्या.
Sharad Pawar-Uddhav Thackeray
Sharad Pawar-Uddhav Thackeray Sarkarnama

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Govt) स्थापन होऊन आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. हे सरकार स्थापन होतानाच्या राजकीय घडामोडी, कुरघोडी, कुरापती आजही राजकीय चर्चेत असतात. ठाकरे घराण्यातील उद्धव हे मुख्यमंत्रीपदी बसणार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 22 नोव्हेंबर रोजी जाहीर केले. त्यानंतर नाट्यपूर्ण घटना घडल्या. पाच दिवसांत दोन मुख्यमंत्री राज्याला पाहावे लागले. (Mahavikas Aghadi Govt completes two years)

महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठीची एक महत्वाची बैठक 22 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हाॅटेलमध्ये सायंकाळी पार पडली. या बैठकीत अनेक घटना घडल्याचे विविध पत्रकारांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काॅंग्रेसकडून मल्लिकार्जून खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात अशी अनेक मंडळी हजर होती. या बैठकीत काॅंग्रेसचे नेते आणि शरद पवार यांच्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद झाला. येथेच महाविकास आघाडीत ठिणगी पडली. काॅंग्रेसचे नेते हे पवार यांचा अवमान करत असल्याचे मत या बैठकीत उपस्थित असलेल्या अजित पवार यांचे झाल्याचे काही पुस्तकांत म्हटले आहे. या बैठकीतून बाहेर येत पवार यांनी मग थेट उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील, अशी घोषणा केली. या घोषणेनंतरच मग चिडलेले अजित पवार हे थेट भाजपच्या गोटात गेले.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
पहाटेच्या शपथविधीच्या वर्षपूर्तीची आठवण करून दिल्यानंतर फडणवीस म्हणाले....

शरद पवार हे घोषणा करून बाहेर गेले. पण यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. भाजपचे सरकार येण्याचा मार्ग बंद झाला होता. काॅंग्रेस ही कधीच शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, असा भाजपचा समज होता. त्यामुळे महाविकास आघाडी स्थापन होणारच नाही, या गैरसमजात भाजपचे नेते राहिले. मात्र पवार यांच्या नावाच्या घोषणेमुळे फडणवीस आणि भाजप अस्वस्थ झाले. दुसरीकडे काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचे सरकार फार काळ चालणार नाही, असे मत अजित पवार यांचे झाले होते. त्यामुळे ते देखील या सरकारच्या स्थिरतेबद्दल साशंक होते. येथूनच मग त्यांनी भाजपच्या नेत्यांशी संधान साधले.

अजित पवार आणि फडणवीस यांच्या रात्रीच्या भेटीनंतर भाजपच्या राजकीय हालचाली वेगवान झाल्या. नवी दिल्लीशी संधान साधण्यात आले. अजितदादांकडे राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून निवड झाल्याचे पत्र होते. त्यामुळे अजितदादा म्हणतील तो राष्ट्रवादीचा निर्णय होणार होता, हे राज्यपालांना सांगण्यात आले. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट उठवावी, अशी केंद्राला शिफारस केली. गृहखाते रात्रभर जागे राहिले. त्यानंतर राष्ट्रपतींना मध्यरात्री उठविण्यात आले. राष्ट्रपती राजवट उठविली गेली असल्याचा आदेश राष्ट्रपती भवनातून जारी पहाटे 5.30 च्या सुमारास जारी करण्यात आला. त्यामुळे राज्यात नवे सरकार स्थापन करण्याचा मार्ग खुला झाला.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
वर्षपूर्ती....पहाटेच्या 'त्या' फसलेल्या शपथविधीची

अजित पवार आणि फडणवीस हे 23 नोव्हेंबरच्या सकाळी सातच्या सुमारास पुन्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यासमोर भेटले. तेथे भाजपचे चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे त्यांना भेटले. ज्या बंगल्यावर भेटण्याचे ठरले ते धनंजय मुंडे मात्र तेथून गायब झालेले होते. राष्ट्रवादीचे काही आमदार अजितदादांच्या निरोपानुसार तेथे आले होते. काही प्रवासात होते. या सर्वाना घेऊन फडणवीस आणि अजित पवार हे राजभवनावर पोहोचले. राज्यपाल त्यांचा वाट पाहतच होते. तेथे त्यांचा सकाळी आठच्या सुमारास शपथविधी झाला. पहाटेचा शपथविधी म्हणून तो आजही राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक ठरला आहे. मात्र हे सरकार फार काळ टिकू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले. तेथे विधानसभेत गुप्त नाहीतर खुल्या पद्धतीने मतदान करण्याचा आदेश झाला. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अजित पवारांनी तीन दिवसांतच भाजपसोबत जाण्याचा निर्णय रद्द केला. आणि त्यानंतर फडवणिसांनाही राजीनामा दिला. त्यामुळे या दोघांचे सरकार बहुमताच्या परीक्षेला सामोरे गेलेच नाही. त्यानंतर पाच दिवसांनी सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेते म्हणून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Sharad Pawar-Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे शपथविधी सभेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा करणार ? 

ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते. मात्र आपण स्वतः त्यांचा हात वर केला आणि आता हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील, अशी बैठकीत घोषणा केल्याचे शरद पवार यांनी त्यानंतर अनेक मुलाखतीत सांगितले. पवारांनी ठाकरेंचा हात वर करण्याच्या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.

महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी सरकार स्थापनेच्या वेळी घडलेल्या घडामोडी

9 नोव्हेंबर 2019

भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण

10 नोव्हेंबर 2019

पुरेसे संख्याबळ नसल्याने सरकार स्थापन न करण्याचा भाजपचा निर्णय. याच दिवशी शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण

11 नोव्हेंबर

शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर. पण प्रत्यक्षात राज्यपालांकडे काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र मिळाले नाही. शिवसेनेचाही सरकार स्थापनेस नकार

12 नोव्हेंबर

राज्यपालांचे राष्ट्रवादीला निमंत्रण पण राष्ट्रवादीचाही सरकार स्थापनेस नकार. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

22 नोव्हेंबर

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा निर्णय. उद्धव ठाकरे यांच्या नावाची पवारांकडून घोषणा

23 नोव्हेंबर

देवेंद्र फडणवीस यांना अजितदादांचा पाठिंबा. राष्ट्रपती राजवट उठली. फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीनही पक्षांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

24 नोव्हेंबर

सर्वोच्च न्यायालयाने विशेष खंडपीठ स्थापन केले.

26 नोव्हेंबर

फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून 24 तासांत बहुमत सिद्ध करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. अजित पवार भाजपच्या गोटातून मागे फिरले. फडणवीस यांचा तीन दिवसांतच राजीनामा. महाविकास आघाडीचा सरकार स्थापनेचा राज्यपालांकडे दावा.

28 नोव्हेंबर

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी

30 नोव्हेंबर

ठाकरे सरकारने बहुमताचा आकडा पार करत 169 मते मिळवली. भाजपचा मतदानाच्या वेळी सभात्याग

1 डिसेंबर 2019

नाना पटोले यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com