एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन संक्रातीच्या दिवशी भेटतात तेव्हा...

जळगाव जिल्ह्यातील या दोन राजकीय नेत्यांत संक्रातीच्या दिवशी रंगलेल्या संवादाचे नाट्य
Eknath Khadse-Girish Mahajan
Eknath Khadse-Girish Mahajansarkarnama

माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन यांच्यात (Girish Mahajan) सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. संक्रातीच्या दिवशी चुकून या दोघांची जळगावाच्या रेस्ट हाऊसवर गाठ पडली आणि हा संवाद सुरू झाला. आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संक्रातीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते रेस्ट हाऊसवर आले होते. दोघांचेही रुम सेप्रेट होते. काही कार्यकर्ते दोन्ही रुममध्ये चलाखीने ये-जा करत होते. कोण कोणाचा समर्थक आहे, हेच काही कळत नव्हते. `तिळगूळ घ्या, गोड गोड बोला`, हे इतक्या वेळा बोलून झाले होते की दोघांचेही तोंड दुखून गेले. इतके गोड बोलायची सवय दोघांनाही नव्हती. त्यामुळे असे होणे साहजिकच होते. दोघेही रुममधून बाहेर पडले आणि त्यांची गाठ पोर्चमध्येच पडली. नाथाभाऊंनी पाहून न पाहिल्यासारखे केले. पण महाजन नेहमीच्या चपळाईने पुढे आले आणि हा संवाद सुरू झाला. (हा संवाद काल्पनिक असून प्रत्यक्षात तसे घडल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

Eknath Khadse-Girish Mahajan
खडसे-महाजन वादात चर्चेत आलेल्या बुधवार पेठेची अशी आहे महती!

महाजन : अहो नाथाभाऊ, नाथाभाऊ नमस्कार.

खडसे : (थोडेसे गुश्शातच) नमस्कार

महाजन : (खडसेंच्या हातावर तिळगूळ ठेवायचा प्रयत्न करत) तिळगूळ घ्या, गोडगोड गोडगोड गोडगोड बोला..

खडसे : (खडसेंनी अजून तिळगूळ हातात घेतलेला नाही) जामनेरचा गूळ कधीपासून गोड झाला? माझं तोंड खराब होईल.. तिकडचा गूळ खाल्ला तर...

महाजन : अहो काळजी करू नका. जामनेरचा गूळ गोडचं आहे. राष्ट्रवादीत गेल्यापासून तुमच्या तोंडाची चव गेलीय. त्यामुळं तुमच्या लक्षात आलं नसेल.

खडसे : अस्स होय? मी राष्ट्रवादीत गेल्यामुळे तुम्हाला भाजपमध्ये सारं काही गोडं गोडं झालं असेल. पण जास्त गोड खाऊ नका. शुगर व्हायची.

महाजन : त्याची काळजी घेतोच... तुम्ही पण जिवाला जपा. सारखाच कोरोना होतोय तुम्हाला. ईडीचे समन्स आले की कोरोनाचे विषाणूपण सोबत येतात का हो?

खडसे : पुणे पोलिसांनी चौकशीला बोलावल्यावर तुम्हाला पण झालाच की कोरोना. पण माझा कोरोना खराय. तुमच्यासारखा डुप्लिकेट कोरोना नाही होत मला.

महाजन : माझा कोरोना खराच आहे. वाटल्यास तुम्हाला रिपोर्ट दाखवतो.

खडसे : तुम्ही कोणत्या डाॅक्टरकडून काढता रिपोर्ट?

महाजन : तुमच्या डाॅक्टरचा नातेवाईकच आहे. तो देतो ऐनवेळी काढून. चांगला डाॅक्टर आहे.

Eknath Khadse-Girish Mahajan
एकनाथ खडसे, गिरीश महाजनांचे भांडण नेहेमीचेच आहे!

खडसे : अस्स होय. मला जास्त फाॅलो करू नका. मी एक पाऊल पुढे असतो.

महाजन : तुमचा हाच प्राॅब्लेम आहे. फडणविसांच्या पुढे पाऊल टाकायला गेले आणि सगळं बोंबललं. आता राष्ट्रवादीत तरी पाऊल जाग्यावर ठेवा.

खडसे : तुमचं बरंये. मागे राहून बरोबर खेचत राहता दुसऱ्याला. तुम्ही पण फडवणिसांच्या नादी जास्त लागू नका. तुमचा कधी पोपट करतील सांगता येत नाही.

महाजन : फडणवीस पोपट करतील की नाही पण तुम्ही मला तर थेट पुण्याच्या बुधवार पेठेतच जाण्याचा सल्ला दिला.

खडसे : पुढं संकटं आहेत तुमच्यावर. त्या आधी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यावं, हे सांगण्यासाठी बुधवार पेठेत जायला सांगितलं. तुम्हाला माझा सल्ला पटतच नाही. तुम्ही मला ठाण्याच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल व्हायला सांगितल्यानंतर तुमची काळजी घेणं माझं कामचं होतं. आता पुणे पोलिस येतीलच तुम्हाला न्यायला. दगडूशेठला न्यायला त्यंना आवर्जून सांगा. वळसे पाटील माझे मित्रच आहेत. त्यांनाही सांगतो. पोलिस बंदोबस्तात तुमची दर्शनाची सोय करतील.

महाजन : पुणे पोलिसांच आणि माझं मी बघून घेईन. पण ईडीचे लोक तुम्हाला मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला घेऊन जातील, याची व्यवस्था करतो. ईडीचे लोक फडणविसांच ऐकतात बरं का. फडणविसांना सांगून होईल ती सोय.

खडसे : अस्स होय. माझी काळजी करू नका. माझ्या आधी तुम्हीच तुमच्या आवडत्या पुण्यात जाल. वळसे पाटलांनी सगळी सोय केलीय.

महाजन : मी जाण्याच्या आधी तुम्हाला तिळगूळ देऊन जातो. महाजन भेटले पण तिळगूळ न देताच गेले, असे तुम्हाला वाटायला नको. आधी तिळगूळ खा आणि तोंड गोड करा बरं.

खडसे : पुण्याला जाताना काही सीडी देतो तुम्हाला. म्हणजे पुण्याच्या मुक्कामात तुमचा चांगला टाईमपास होईल.

Eknath Khadse-Girish Mahajan
खडसे-पाटील हा तर जुना वाद, तो चर्चेतून सुटेल!

महाजन : त्या सीडी तुम्हीच बघत बसा. म्हणजे तुम्हालाही बरे वाटेल. किती दिवस नुसतं सीडी दाखवणार दाखवणार सांगत होता. पण तुम्हाला त्या इतक्या आवडल्यात की दुसऱ्यांना दाखवायला तयारच नाहीत.

खडसे : वेळ आल्यावर काढीन त्या बाहेर.

महाजन : बरं बरं. असू द्या. तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.

खडसे : तुम्ही पण तिळगूळ घ्या... कधी तरी खरंखरंही बोला.

महाजन : नाथाभाऊ, तुम्ही आमचेच नेते होता. तुमच्या पायापाशी बसून काही गोष्टी शिकलोय. घ्या सांभाळून शिष्याला. नमस्कार.

खडसे : नमस्कार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com