त्याग अन् समर्पण म्हणजे देवेंद्रजी फडणवीस..

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाच वर्ष जो कारभार केला तो महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा ठरला. ( Deputy Chief Minister Devendra Fadanvis)
Deputy Cm Devendra Fadanvis News
Deputy Cm Devendra Fadanvis NewsSarkarnama

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणात त्याग अन् समर्पणासाठी ज्या नेत्याचे नाव घेतले जाते ते म्हणजे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. `पहिले राष्ट्र, फिर पार्टी और बाद मे स्व`. हे भारतीय जनता पार्टीचे ब्रीद प्रत्यक्ष आचरणात आणणारे, तसे वागणारे म्हणून फडणवीसांकडे पाहिले जाते. जिद्द, कष्ट, संयम आणि समर्पण वृत्तीच्या बळावर त्यांनी अत्यंत कमी काळात राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला. सत्ता असो की नसो, जनतेशी, समाजाशी असलेली बांधिलकी ते कायम जपत आले आहेत, अशा शब्दात भाजपचे प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी यांनी फडणवीसांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत त्यांनी महाराष्ट्रात राजकारण केले. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजना, केंद्राची मदत पोहचली पाहिजे ही त्यांची धडपड मी एक कार्यकर्ता म्हणून खूप जवळून पाहिली आहे. राज्यावर कोणतेही नैसर्गिक संकट असो फडणवीस साहेबांनी कशाचीही तमा न बाळगता तिथे धाव घेतली आणि सामान्यांना मदतीचा हात दिला.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाच वर्ष जो कारभार केला तो महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा ठरला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, नोकरदार, आदिवासी, गोर-गरीब अशा सर्व घटकांसाठी त्यांनी सत्तेचा उपयोग करून घेतला. सातत्याने दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या राज्य विशेषतः मराठवाड्यात त्यांच्या संकल्पनेतून झालेली जलयुक्त शिवार योजनेची कामे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरणच म्हणावे लागेल.

मराठवाडा वाॅटर ग्रीडला पुन्हा गती येईल..

राज्याच्या सिंचन क्षेत्रात जलयुक्त शिवारने मोठी क्रांती केली. या शिवाय मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजनादेखील त्यांनी राज्याला दिली होती. पण महाविकास आघाडी सरकारने ती स्थगित केली. आता या योजनेला देखील पुन्हा वेग येईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कुठल्याही राज्याच्या विकासात दळणवळणाचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी हाती घेतलेला नागपूर ते मुंबई हा समृध्दी महामार्ग त्यांच्या व्हिजनचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फडणवीसांनी राज्याचा चौफेर विकास तर साधलाच, पण महाराष्ट्राला देश आणि जागतिक पातळीवर देखील मानाचे स्थान मिळवून दिले. राज्यातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, महापुराने होणारे नुकसान यातही त्यांनी बळीराजाला आधार दिला. राज्य व केंद्राची मदत असो की मग पीक विम्याच्या माध्यमातून मिळणारे पैसे यात फडणवीसांनी जातीने लक्ष घातलेले पहायला मिळाले.

Deputy Cm Devendra Fadanvis News
सत्तांतरानंतर भाजपचं पहिलं सेलिब्रेशन पनवेलमध्ये...

राज्यातील सत्तांतरानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही तितक्याच नेटाने पार पाडली. महाभयंकर कोरोनासारखे जीवघेणे जागतिक संकट देशावर आणि राज्यावर आले तेव्हा जीवाची पर्वा न करता ते फिरले. नागरिकांना अन्न,धान्य, औषधोपचार, ऑक्सिजन, रुग्णालयात बेड मिळवून देण्यापर्यंत त्यांनी मदत केली. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्यांच्या घरातील चूल पेटली पाहिजे यासाठी केंद्रातील नेतृत्वाशी बोलून मोफत धान्य पुरवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.

सामान्यांच्या पाठीशी सदैव खंबीर..

पूर, अतिवृष्टी असो, की मग दुष्काळाचे दुर्भिक्ष्य, फडणवीस हे सदैव राज्यातील गोर-गरीबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले मी स्वतः अनुभवले आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला, याचा मीदेखील साक्षीदार होतो. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीत फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्याग आणि समर्पण वृत्तीचे दर्शन घडवले. ते नेहमी म्हणतात, सत्ता हे साध्य नाही, तर साधन आहे. भाजपकडे सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ असताना पक्षादेश शिरसावंद्य मानत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची जबाबदारी स्वीकारली.

त्यांचा पायगुण असा, की सत्तांतर होऊन दोन आठवडे होत नाही तोच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटला. सर्वोच्च न्यायालयाने ओबोसींचे राजकीय आरक्षण पुन्हा बहाल केले. या आरक्षणासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दिलेला लढा कधीही विसरता येणार नाही. ओबीसींना जे राजकीय आरक्षण परत मिळाले आहे, त्याचे खरे श्रेय हे त्यांनाच जाते. भविष्यातदेखील त्यांच्या हातून या राज्यातील जनतेची सेवा घडत राहील, ही सदिच्छा त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने देतो.

शब्दांकन : जगदीश पानसरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com