राजकीय हिशेब चुकते करण्यास एकत्र आलेल्या विरोधकांना पवारांनी दाखवला कात्रजचा घाट!

आमदार अशोक पवार यांचा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय
Ashok pawar

Ashok pawar

sarkarnama

शिरूर (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीतील तब्बल ४१ हजारांच्या फरकाने सुरू झालेली राष्ट्रवादीचे आमदार ॲड. अशोक पवार (ashok pawar) यांची विजयी घोडदौड रोखण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन व्यूहरचना केली खरी. पण पवारांनी वर्षभरापासून केलेल्या तयारी प्रत्यक्षात उतरवत ती भेदून टाकली. राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सरसावलेली छुपे रुस्तम आणि असंतुष्टांना कात्रजचा घाट दाखवत अशोक पवार यांनी जिल्हा बॅंकेचा गड अखेर सर केलाच. कधी नव्हे ते एकसंघ झालेल्या राष्ट्रवादीने (ncp) विरोधकांकडे असलेले जिल्हा बॅंकेचे एकमेव पदही हिसकावून घेतले आहे. (MLA Ashok Pawar's victory in District Bank elections by a big margin)

जिल्ह्यातील इतर तालुक्यातील संचालक आमदारांच्या पंक्तीत बसण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी वर्षभर आधीपासून तयारी सुरू केली होती. निवडणूक जाहीर होताच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मैदानात उतरवले. त्यांच्या सोबतीला स्वतःची अशी ‘खास’ माणसंही कामाला लावली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी असलेल्या कथित मतभेदांमुळे आंबेगाव मतदारसंघाला जोडलेल्या ३९ गावांतून काय होणार याची चर्चा रंगली होती. मात्र, शिरूर मतदारसंघात एकहाती वर्चस्व राखून असलेल्या पवारांनी विभागीय अस्मिता जपणारे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद राखला. अत्यंत कौशल्याने जुने मतभेद संपवून टाकले. पोपटराव गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा झालेला दौरा पवारांसाठी लाभदायी ठरला. त्या कार्यक्रमानंतर दोन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी एक झाली आणि जिल्हा बॅंकेतील पवारांचा मार्ग सुकर झाला.

<div class="paragraphs"><p>Ashok pawar</p></div>
अशोक पवारांनी धोका ओळखून फिल्डिंग लावली; पण कंदांनी विजयाची संधी साधलीच!

निवृत्तिअण्णांच्या माघारीने विरोधकांची हवा गेली

नुकत्याच झालेल्या ‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीतील यशाने गलितगात्र विरोधकांना काहीसे बळ मिळाले होते. माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे प्रकृती ठीक नसतानाही मैदानात उतरले. त्यांनी आपल्या पद्धतीने मतदारांची जुळवा जुळव केली. पण, गेल्या काही वर्षांपासून बॅंकेचे तालुक्यात नेतृत्व करणारे निवृत्तिअण्णा गवारे यांनीच तलवार म्यान केल्याने विरोधकांचे अर्धे बळ निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच गेले होते. पण, अशोक पवारांची निवड बिनविरोध होऊ द्यायची नाही, म्हणून विरोधकांनी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आबासाहेब गव्हाणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पण, गव्हाणे यांचे आव्हान किरकोळ होते, हे निकालानंतर स्पष्ट झाले. गव्हाणे यांना पुढे करून केलेली खेळी क्षीण ताकदीमुळे विरोधकांवरच उलटली.

<div class="paragraphs"><p>Ashok pawar</p></div>
पुणे जिल्हा बँक : अशोक पवारांचा एकहाती विजय; सातवे आमदार संचालक

अशोक पवारांची ताकद वाढली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात शिरूर तालुक्‍यातील सर्व सत्तास्थाने आहेत. या सर्व संस्थांमध्ये पवारांचा शब्द अंतिम आहे. तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते हे आमदारांच्या शब्दापुढे नाहीत. या निष्ठेची अन्‌ एकजिनसीपणाची प्रचिती १०९ विरुद्ध २१ या मतदानाच्या एकतर्फी सरासरीवरून दिसून आली. अशोक पवार यांचा झंझावात विधानसभेपासून जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीपर्यंत कायम आहे. निवृत्तिअण्णा गवारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे असले; तरी आमदार पवार यांचे विरोधक अशीच त्यांची ओळख आहे. त्यांची सद्दी संपविण्यासाठी यंदा स्वतःच मैदानात उतरण्याचा निर्धार पवार यांनी केला होता. पहिल्याच फटक्‍यात गवारे यांच्या माघारीमुळे त्या निर्धाराला बळ मिळाले. विरोधकांकडील एकमेव पदही राष्ट्रवादीने हिसकावून घेतले आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची विशेषतः आमदार अशोक पवारांची ताकदही वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in