N. D. Patil : महाराष्ट्राचा सहकारमंत्री कपडे धुताना पाहिला होता?

N. D. Patil यांना महाराष्ट्र भरातून भावपूर्ण श्रद्धांजली
N. D. Patil : महाराष्ट्राचा सहकारमंत्री कपडे धुताना पाहिला होता?
Memories of N.D. Patil sirSarkarnama

पुणे : एन. डी. पाटील (N. D. Patil) महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते तेव्हाची गोष्ट. एका सकाळी त्यांच्याकडे एक माणूस भेटायला आला. बंगल्यावर कोणीही कर्मचारी नव्हता. तो माणूस सरळ आत गेला. बैठकीच्या खोलीत बसला. बराच वेळ कोणी बाहेर येईना, म्हटल्यावर तो ज्या दिशेने कपडे धुण्याचा आवाज ऐकू येत होता, तिकडे चौकशी करायला गेला. तेव्हा एन. डी. पाटील त्याला तिथे कपडे धूत बसलेले दिसले. त्या माणसाची चाहूल लागल्यावर त्यांनी वळून बघितलं आणि म्हणाले, "तुम्ही माझ्याकडे आलाय का? जरा थांबा. आलोच मी. आज सुट्टी होती म्हणून कपडे धूत होतो,'' तो माणूस ते दृश्य पाहून बघतच राहिला. कारण महाराष्ट्राचे सहकारमंत्री स्वतःचे कपडे धूत, आहेत हे त्याच्या दृष्टीने धक्कादायक होतं.

Memories of N.D. Patil sir
शोषित, वंचितांचा आवाज हरपला; प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्याबाबतीतला हा एक प्रसंग. असे अनेक प्रसंग सांगता येतील. त्यांचे कार्यकर्ते असे घडलेले प्रसंग सांगतात. आज एन डी पाटील आपल्यात नाहीत. काही वर्षांपूर्वी एन. डी. पाटील यांनी कोल्हापूरात एक आंदोलन केलं. कोरोनाच्या काळातील घरगुती वीज बिलाची होळी करणारं हे आंदोलन. वयाची नव्वदी ओलांडली आहे. दोन्ही पायांना त्रास आहे. चालता येत नाही. पायांना अपघातात इजा झालीय. चालता येत नाही म्हणून घरात बसणारा हा नेता नाही. लढणं माहिती आहे. सरकार कोणाचेही असो. सरकारी धोरणं श्रमिकांच्या हिताच्या विरोधात निघाली की एन. डी. पाटील रस्त्यावर आलेच. `लडेंगे, जितेंगे` ही त्यांची आवडती घोषणा. ती त्यांच्याच बुलंद आवाजात ऐकायला पाहिजे. आंदोलन बघत उभा असलेल्या बघ्या माणसालाही त्या आंदोलनात सहभागी व्हावं असचं वाटे.(Memories of N.D. Patil sir)

Memories of N.D. Patil sir
ज्येष्ठ शेकाप नेते एन. डी. पाटील यांचं निधन; पाहा व्हिडिओ

सांगली जिल्ह्यातील ढवळी हे वाळवा तालुक्यातील `एनडी` यांच गाव. शाळकरी वयात असतानाच सत्यशोधक विचार ऐकायला मिळाले. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली. मग रयत शिक्षण संस्थेशी जवळून संबंध आला. प्राध्यापक म्हणून रुजू झाले. याच दरम्यान त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेतकरी कामगार पक्षासाठी द्यायचा निर्णय घेतला. जीवनदानी कार्यकर्ते बनले.नंतर शेतकरी कामगार पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केले. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ते विधानपरिषदेवर गेले.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह दणादूण सोडले. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांची सभागृहात चर्चा केली, प्रश्न सोडवले. १८ वर्षे या सभागृहात त्यांनी काम केले. १९७८ साली त्यांना पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामकाजाची आजही चर्चा होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली कापूस एकाधिकार योजना त्यांनीच सुरू केली. मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अंमलात आणला. एन. डी. पाटील यांच्यासमोर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श होता. त्याच आदर्शाने ते आयुष्यभर वागले. सत्तेत जायची संधी मिळाली, पण तेव्हाही त्यांच्या जगण्यात आणि साधेपणात काहीही फरक पडला नाही.

Memories of N.D. Patil sir
एन. डी. पाटील....नेता नव्हे एक विचार!

ते जेव्हा सहकारमंत्री होते. तेव्हा त्यांच्या मुलाला सुहास यांना मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता.एक दोन गुण कमी होते. त्यांनी त्यांचे मामा शरद पवार मुख्यमंत्री होते,वडील एन डी पाटील सहकारमंत्री होते. पण त्यांचा वशिला न लावता रांगेत उभा राहून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.वडिलांचा व्यवसाय या रकान्यात त्यांनी शेती असे लिहिले. पण मामा किंवा वडील यांची ओळख सांगितली नाही,' अशी आठवण एन. डी. यांच्या पत्नी सरोजमाई यांनी सांगितली होती.

आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी लोकांशी बांधिलकी मानुन काम करणारा हा लोकनेता. एकाचवेळी अनेक संस्थांचे नेतृत्व करत असताना त्या संस्थाचा कारभार आदर्श रीतीने झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका राहिली. एन डी पाटील आमदार झाले त्या दिवसापासून आजअखेर आपल्या मानधनातील रक्कम गरीब कार्यकर्त्यांना देत. अडचणीत असलेल्या कार्यकर्त्याला हातभार लावणारा महाराष्ट्रातील हा एकमेव नेता असेल. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एनडी हे एका नेत्यांचं नाही तर एका विचाराचं नाव आहे. ते एक वादळ होतं. वादळाला कुठली आलीय विश्रांती? लढणं या माणसाच्या रक्तात होतं. एनडी चा दुसरा समानार्थी शब्द संघर्ष हाच त्यांनी आपल्या जीवनातून दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.