`मी जास्त काही लिहिले तर राजकीय भूकंप होईल`

ठाणे शहरातील राजकारणाचा इतिहासच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मांडला आहे..
`मी जास्त काही लिहिले तर राजकीय भूकंप होईल`
Jitendra Awhad-Sudhakar ChavanSarkarnama

ठाणे शहराचे माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण (वय 65) (Sudhakar Chavan) यांचे शनिवारी (7 मे) निधन झाले. त्यांनी चार वेळा स्थायी समिती आणि एकदा परिवहन समितीचे सभापती पद भूषविले होते. ठाणे महापालिकेच्या (Thane Corporation) राजकारणातील दादा माणूस असलेले चव्हाण यांचे वेगळे स्थान होते. रिक्षा चालक ते ठाण्याचा नेता असा त्यांचा प्रवास झाला. १९९२ ते २०१७ असे तब्बल २५ वर्षे म्हणजेच पाच टर्म ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या निधनानिमित्त गृहनिर्माणमंत्री आणि ठाण्याच्या राजकारणात छोट्याचे मोठे झालेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तेथील 1980 ते 2020 या दोन दशकतील राजकीय पट उलगडून दाखवला आहे. तो त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे :

विजू...सुधा...गण्या : एक पर्व'

सुधा गेला. साधारणपणे 80 ते 90 च्या दशकामध्ये ठाण्यामध्ये खूप घडामोडी झाल्या. त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. God Father कादंबरीमधील वाक्य खरे आहे. Behind Every Great Fortune There is a Crime, या वाक्याची मला आज आठवण येते. सुरवातीला या त्रिकुटातील विजू नाटेकर यांच्याबद्दल.

विजू हा माझा मित्र नव्हता. पण मी त्याच्या परिचयाचा होतो. माझी जिज्ञासा नेहमी जागी असल्यामुळे मी त्याचा कायम अभ्यास करायचो, पाठलाग करायचो. विजू नाटेकर पहिल्यांदा 76 सालामध्ये कॉलेजमध्ये निवडणूक जिंकला. विजू हा काँग्रेसच्या विचारांचा होता. एका पोलिस ऑफिसरचा मुलगा. कडक शिस्तीच्या विजूच्या वडिलांनी कधीही कोणाच्या पैशाला स्पर्शही केला नाही. विजूदेखील तसाच. हळूहळू त्याचे पंख पसरायला लागले. तो ठाण्यातील रिक्षावाल्यांच्या गळ्यातील ताईत झाला आणि सर्वसामान्य लोकांना विजूचे नेतृत्व पचनी पडायला लागलं. कोणी कितीही वाजता विजूकडे जावं आणि विजूने त्यांच्यासाठी वाटेल त्या ठिकाणी धाव घ्यावी, असं विजूचे नेतृत्व होत. वसंतदादा पाटील यांच्या अत्यंत जवळचा माणूस हा त्याची राजकीय ओळख त्याला फार कामी आली. विजू नाटेकर हा कॉलेजमधून बाहेर पडला आणि मी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. आमच्या कॅन्टीनचे मालक ह्यांच्या तोंडातून मी विजूच्या अनेक कहाण्या ऐकायचो आणि त्याचे व्यक्तिमत्व हे माझ्या मनावर प्रभाव टाकायचे.

Jitendra Awhad-Sudhakar Chavan
विलासराव आज असते तर, या भाजप आमदाराच्या प्रश्नावर धीरज देशमुख म्हणाले...

विजू नाटेकरांची हत्या..

विजू नाटेकर हा बिकेबीनमध्ये राहायचा आणि त्याच वेळी बिकेबीनमध्ये गण्या उर्फ गणेश गंगाराम सावंत ह्याचं प्रस्थ वाढायला लागलं होत. हा विजू नाटेकरचाच शिष्य. अचानक एक दिवशी मात्र कारण सांगण्यासारखी नाहीत पण भरल्या ताटावर बसलेला विजू उठला. एका रिक्षावाल्याचे नातेवाईक गंभीर आजारी आहेत आणि सिव्हिलला मदत होत नाही असं कोणी रडत रडत सांगायला आले. तेव्हा विजू तसंच ताटावरून उठला हात धुतले. त्याला म्हटले कि असच ताटावरून मध्येच उठायचं नसत. पण ते न ऐकताच विजू रिक्षात बसून सिव्हिल हॉस्पिटलला गेला. सिव्हिल हॉस्पिटलच्या नाक्यावरती त्याला अडवण्यात आले. त्याला लक्षात आले कि आपला घात झाला आहे. तसेच घडले. शांताराम नारंगीकर व भाई भोसले यांनी त्याची निर्घृण हत्या केली. याच्या मागचे राजकारण कोणाचे होते? काय होते ? हे त्यावेळेच्या राजकारण्यांना व्यवस्थित माहीत आहे. विजू हा उगवता आणि धगधगणारा तारा होता. तो अनेकांच्या डोळ्यात खुपत होता. त्यानंतर नंतर सुधाने (सुधाकर चव्हाण) विजू नाटेकर रिक्षा टॅक्सी युनियन पुढे चालू केली. ती आजही कार्यरत आहे.

गण्या सावंतचा उदय!

त्यानंतर हळू हळू गणेश गंगाराम सावंत (गण्या) याच्या नावाचा दरारा व दहशत निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेस ठाण्यामध्ये दरारा आणि दहशत ह्यावरतीच राजकारण चालत असे. गणेश गंगाराम सावंत ह्याचे गरिबांबरोबरचे वागणे व गरिबांना न्याय देण्याची त्याची प्रवृत्ती यामुळे तो गोरगरिबांमध्ये गण्या ह्या नावाने प्रसिद्ध होऊ लागला. त्याने एक स्वतःच टोळकं तयार केलं आणि त्या टोळक्याने मग अख्ख ठाणेच काबीज केलं. त्याच दरम्यान विजू नाटेकर यांच्याजवळ असलेला सुधा उदयास आला. सुधा आणि थापा यांचे अत्यंत जवळचे संबंध. सुधाने संपूर्ण महाराष्ट्रभर मित्रांचे जाळे विणले होते. आजही त्याच्या अंत्ययात्रेला गेलो असता सोलापूरचे माजी आमदार, नाशिकचे मोठे मोठे व्यापारी, पुण्याचे मोठे मोठे व्यापारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी मंगळी येऊन मला भेटली. सुधाचे एक आवडते वाक्य होते. "जिसका नही खुदा उसका है सुधा" पण मात्र काळाची पावलं पलटली. दोघेही निवडून आले होते. दोघांनीही महापालिकेची व्यवस्था ताब्यात घेतली होती. ज्यांचं त्या दोघांशी पटायचं नाही ते महापालिकेमध्ये यायला देखील घाबरायचे, अशी दहशत त्यांनी बसवली होती.

Jitendra Awhad-Sudhakar Chavan
Sarkarnama open mic : खासदार जलील यांना कठीण प्रश्न आणि त्यांची चपखल उत्तरे

सुधाकरराव नाईक, मदन बाफना आणि ठाणे

सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मदन बाफना यांचं फारसे सख्य नव्हतं. मदन बाफना यांनी ठाणे शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबुतीने उभी करायला सुरुवात केली होती. पण सुधाकरराव नाईक आणि मदन बाफना यांच्यामध्ये खटके उडाले आणि त्याचा परिणाम पहिल्यांदा गण्याला टाडा लागला आणि त्यानंतर सुधाला टाडा लागला. त्यानंतर ठाण्याचं राजकारण बदलायला सुरुवात झाली.

त्याच्यानंतर मात्र हळू हळू गण्याच्या प्रगतीला खीळ बसली व गण्या फरार झाला. सुधा मात्र आपलं अस्तित्व टिकवून होता. सुधा पांढरपेशा वर्गामध्ये जिथून तो निवडून यायचा तो पांढरपेशा वर्ग सुधाला सुधाभाई म्हणायचा. पण त्यांच त्या भाई म्हणण्यामागे दहशत नव्हती तर प्रचंड प्रेम होत. कुठलीही समस्या असो सुधा मदत करणार हे समीकरण झालं होत. त्यामुळे तो अनेकवेळा निवडून आला. एकीकडे गण्याच्या मागे पोलीस लागले होते. त्यामुळे गण्या ठाण्यातून गायब झाला व त्याच्या जन्मगावी गेला. माझा गण्या हा अतिशय चांगला मित्र होता. गण्या रात्री 7 ते 7.30 वाजले कि अंथरूण एक चादर आणि एक उशी घेऊन गायब होत असे. तो कुठे जायचा, कुठे झोपायचा कधीही कोणाला सांगत नसे व परत सकाळी तो आपल्या घरी येत असे. एक काळ गण्या आणि पक्या नावाची जोडी ही पूर्ण ठाण्यावर राज्य करत होती. गण्या तसा हळू हळू शांत होत गेला. गण्याच्या सगळ्या केसेसही सुटल्या आणि गण्या ठाण्यात आला. पण तो बदललेला गण्या होता. `वक्त ने उसके बाजूओ को खोकला बना दिया था.` तो सुटून आला तसा तो मला भेटायला आला. त्याच ठरलेलं वाक्य होत. 'गणपती बाप्पा मोरया,' जेव्हा माझी आणि त्याची पुनर्भेट झाली तेव्हा त्याने मला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला 'गणपती बाप्पा मोरया'. मला त्याने मारलेल्या मिठीतच समजलं कि पूर्वीचा आता गण्या राहिलेला नाही. एक दोन वर्षांपूर्वी गण्याही गेला.

Jitendra Awhad-Sudhakar Chavan
Sarkarnama Open Mic Challenge: इम्तियाज जलील खरंच आहे का भाजपची टीम बी

सुधाकर चव्हाणही निर्वतला..

मुंबईपासून दिल्लीपर्यंत आपल्या मित्रांचं जान बनलेला आज सुधाही गेला. ह्या दोघांचा `गॉड फादर` विजू नाटेकर हा तर कधीच गेला होता. पण विजू नाटेकरच्या जाण्याने ठाण्यामध्ये काँग्रेसच्या विचारांची एक प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. आक्रमक काँग्रेसवाला म्हणून विजूची जी ओळख होती ती नंतर कोणीच बनवू शकली नाही. काँग्रेसचे आजचे दिवस हे का आले ? ह्याच्यामागे फक्त विजू नाटेकरची हत्या आहे. ह्याच्यात ज्यांना माहिती आहे. हत्येचं कारण काय ? टाडा कसा लागला. त्यांना हे समीकरण बरोबर समजेल. पण ह्या तिघांचं आयुष्य मी अत्यंत जवळून बघितलं आहे. त्यांची दहशत, त्यांचा दबदबा, त्यांचं लोकांशी वागणं हे देखील मी अत्यंत जवळून बघितलं आहे. कारण विजू गेला तेव्हा ठाणा कॉलेजमध्ये असलेला मी विद्यार्थी ठाणा कॉलेज बंद करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. ते देखील प्रिन्सिपलबरोबर भांडून.

हा 35 वर्षांचा प्रवास आहे. आज सुधाच्या जाण्याने ह्या तिघांमधली शेवटची कडी तुटली. माझा मित्र सुधाकर वामन चव्हाण ऊर्फ सुधाभाई याला अंतिमतः आता मी निरोप दिला तेव्हा ह्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या. ह्याच्यात लिहिण्यासारखं खूप काही आहे. कारण विजूच्या मृत्यूनंतर, गण्याच्या उदयानंतर आणि सुधाच्या राजकीय प्रवेशानंतर ठाण्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्या जर लिहिल्या तर ठाण्यात भूकंप होईल. सुधाच्या आत्म्यास शांती लाभो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.