
मुंबई : आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्यावर नक्कीच काहीतरी दबाव आणला जात आहे, त्यामुळेच त्यांना तेथून निघता येत नाही. आम्ही त्यांची खूप वाट पाहिली. पण, त्यांचा फोन नाही की निरोप नाही. आम्हाला आमदारसाहेबांची काळजी वाटत आहे, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मी सूरतला जाणार आहे. तेथील लोकांना मी एकच विनंती करणार आहे की मला फक्त नितीन देशमुख यांना भेटू द्यावे, अशी प्रतिक्रिया बाळापूरचे शिवसेनेचे (shivsena) आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी दिली. (I will go to Surat to meet MLA Nitin Deshmukh: Pranjali Deshmukh)
एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेचे काही आमदार आपल्यासोबत गुजरातला नेले आहेत. त्यामध्ये बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्याठिकाणी त्यांना मारहाण झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मारहाणीनंतर देशमुख यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इकडे बाळापूरमध्ये त्यांची पत्नी प्रांजली यांनी आपले पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
मी सूरतला जाणार आहे. कोणी रोखले तरी मी आमदार नितीन देशमुख यांच्याकडे जाणारच आहे, असा ठाम निर्धारही देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी बोलून दाखविला. सध्या माझ्या मनाची मोठ्या प्रमाणात घालमेल सुरू आहे. माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. आमदार देशमुखसाहेब असलेल्या हॉटेलमध्ये कोणालाही सोडत नसले तरी मी त्यांची पत्नी आहे. त्यांना मला माझ्या पतीला भेटू आणि बोलू द्यावेच लागेल. मला भेटण्यापासून ते असं कसं रोखू शकतील, असा प्रश्नही त्यांनी केला.
आमदार नितीन देशमुख नॉटरिचेबल असणे आणि सूरतला जाण्यासंदर्भात माझे शिवसेनेच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांशी काहीही बोलणे झालेले नाही. आमदार देशमुख यांना कोणाशीही बोलू दिले जात नाही. त्यांच्यावर दबाव आणल्यामुळेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले असावे, असे मला वाटते. सध्या माझ्या मनाची मोठ्या प्रमाणात घालमेल सुरू आहे. माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
ज्या अर्थी नितीन देशमुख यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्या अर्थी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला गेला असेल. कारण, देशमुख मानसिकदृष्ट्य सक्षम आणि खंबीर आहेत. ते चुकीचे काहीही वागू शकत नाही, असा माझा विश्वास आहे. ज्या ठिकाणी नितीन देशमुख यांना ठेवण्यात आलेले आहे, तेथील लोकांना मी एकच विनंती करणार आहे की मला फक्त आमदार देशमुख साहेबांना भेटू द्या आणि त्यांच्याशी बोलू द्या, असेही त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.